Bhosari crime news: दरोडा टाकण्यासाठी आलेले सराईत टोळीतील सख्खे भाऊ जेरबंद

Bhosari crime news: दरोडा टाकण्यासाठी आलेले सराईत टोळीतील सख्खे भाऊ जेरबंद
३० लाखांचा मुद्देमाल जप्त
Pckhabar-हडपसर येथून भोसरी परिसरात घरफोडी करण्यासाठी आलेल्या सराईत टोळीचा पाठलाग करून त्यातील सख्ख्या भावांना पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केले.

त्यांच्याकडून चार मोटार, चार दुचाकी, १७ तोळे सोने, एक किलो चांदी, तीन
टीव्ही, रोकड आणि घरफोडीचे साहित्य असा ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला आहे.
सुरजितसिंग राजपालसिंग टाक (वय ३२), जितसिंग राजपालसिंग टाक (वय २६, रा.
बिराजदारनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दरोडा विरोधी पथकाचे फौजदार मंगेश भांगे यांना गस्त घालत असताना इंद्रायणीनगर, भोसरी परिसरात हडपसर येथील सराईत गुन्हेगारांची टोळी मोटारीतून येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले. तिघे  पसार झाले. तर, दोघे जण पोलिसांच्या हाती लागले.
आरोपींनी पिंपरी – चिंचवडमध्ये १७, पुणे शहर २ आणि पुणे ग्रामीण परिसरात
दोन घरफोडी तसेच वाहनचोरी केल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच
मोटारी, चार दुचाकी अशी नऊ वाहने, १७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक
किलो चांदीचे दागिने, रोकड, तीन टीव्ही आणि घरफोडीचे साहित्य असा ३० लाख
रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सुरजितसिंग टाक याच्या
विरोधात विविध पोलीस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी आणि वाहनचोरीचे २५ गुन्हे तर, जितसिंग टाक याच्या विरोधात २३ गुन्हे दाखल आहेत. अन्य एक आरोपी सनी सिंग दुधानी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे आणखी दोन साथीदार अद्याप पसार आहेत. हे सर्व आरोपी नातेवाईक आहेत. दरोडा विरोधी पथकाने केलेल्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पथकाला ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.