Dehu News : माघ शुद्ध दशमी सोहळ्यानिमित्त काल्याच्या महाप्रसादाने भंडारा डोंगरावरील अखंड गाथा पारायण सोहळ्याची सांगता

Dehu News : माघ शुद्ध दशमी सोहळ्यानिमित्त काल्याच्या महाप्रसादाने भंडारा डोंगरावरील अखंड गाथा पारायण सोहळ्याची सांगता
Pckhabar-रोज पहाटेचा काकडा, अभिषेक, महापूजा, हरिपाठ, नांदेड जिल्ह्यातील वाकुळणी येथील संतपीठाचे प्रमुख, हभप नानामहाराज तावरे यांच्या सुमधुर व सुश्राव्य वाणीतून जगदगुरु तुकोबारायांची पंचम वेद असणारी अभंग गाथेचे हजारो भाविकांच्या मंत्रमुग्ध स्वरात सामुहिक पारायण, सायंकाळी ४ ते ६ या कालावधीत विद्यावाचस्पती हभप रविदासमहाराज शिरसाठ यांच्या सुमधुर, सुश्राव्य व अभ्यासपूर्ण शैलीत कैवल्यमुर्ती संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनचरित्रावर तत्वचिंतन, रात्री ८ ते 10 या कालावधीत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा व जागर. विश्ववंदनीय, जगदगुरु, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अनुग्रह दिन म्हणजे माघ शुद्ध दशमी तिथी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हा सुवर्णयोग एकाच दिवशी आल्याने व त्याला लागुनच शनिवार, रविवारची सुट्टी यामुळे संपूर्ण सप्ताहभर रोज उसळणारी भाविकांची अलोट गर्दी, अशा अत्यंत भक्तीमय, उसाही वातावरणात माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने वसंतपंचमीपासून श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर सुरु झालेल्या ‘अखंड गाथा पारायण व कीर्तन महोत्सवाची’ सांगता आज हभप, गुरुवर्य उमेशमहाराज दशरथे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. उपजोनिया पुढती येऊ | काला खाऊ दहीभात || वैकुंठी तो ऐसे नाही | कवळ काही काल्याचे || या तुकोबारायांच्या अभंगावर निरुपण करीत हभप, गुरुवर्य उमेशमहाराज दशरथे यांनी गोकुळातील भगवंताच्या विविध लीला अनेक रुपकांमधून व दृष्टांतामधून सांगितल्या.

काल्याच्या कीर्तनप्रसंगी मावळचे खासदार श्रीरंगआप्पा बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, संत तुकाराम सहकरी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, उद्योजक विजयशेठ जगताप, ट्रस्टचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशीद व सर्व विश्वस्त मंडळ तसेच भंडारा डोंगर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काल्याच्या कीर्तनापुर्वी गाथा पारायणाची समाप्ती होताच उपस्थित हजारो भाविकांनी तुकोबारायांची गाथा व तुळशी वृंदावन डोक्यावर घेत मुख्य मंडपातून हरिनामाचा गजर करीत दिंडीने डोंगराला प्रदक्षिणा घातली. ज्ञानोबा- तुकाराम असा एकच नामघोष करीत महिला व पुरुष वाचक भाविकांनी फेर धरीत फुगड्या देखील मोठ्या आनंदाने घातल्या. प्रदक्षिणा पूर्ण होताच मुख्य कीर्तन मंडपात श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व दशमी सोहळा समितीच्यावतीने या सोहळ्यासाठी सहकार्य करणारे कीर्तनकार, गायक, वादक, वाचक, भाविक श्रोते, आचारी, मंडपवाले, तसेच आर्थिक व वस्तुरुपू देणगी देणारे सर्व दानशूर दाते, इंदोरीसह मावळ, मुळशी, खेड, हवेली तालुक्यातील या सोहळ्यासाठी अहोरात्र झटणारे सर्व तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थ, महाप्रसादाचे वाटप करणारे खांडी, बोरवलीचे ग्रामस्थ, पायथ्यापासून मंदिरापर्यंत मोफत बस सेवा पुरविणारे युवा उद्योजक श्री गणेशशेठ बोत्रे व देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल या सर्वाच्या सहकार्याबद्दल ट्रस्टच्यावतीने हभप बाळासाहेब काशीद यांनी आभार व्यक्त केले.

काल रात्री ८ वा. वारकरी रत्न ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) यांची सेवेलागी सेवक झालो | तुमच्या लागलो नीज चरणा || अहो स्वामी तुकया देवा | यावरी न करावा अव्हेर || या संत निळोबारायांच्या अभंगावर कीर्तन सेवा झाली. येणारे वर्ष हे जगदगुरु तुकोबारायांचे त्रिशतकोत्तर वैकुंठगमन अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमिताने महाराष्ट्रीतील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी भाविक व प्रमुख देवस्थाने यांच्या सहकार्याने भंडारा डोंगर ट्रस्टच्या माध्यमातून डोंगराच्या पायथ्याला लाखो भाविकांचा भव्य असा पारायण सोहळा संपन्न व्हावा, अशी मनोकामना छोटे माऊली यांनी या कीर्तनाप्रसंगी व्यक्त केली.

काल्याच्या कार्यक्रमासाठी आज देखील भाविकांची मोठी गर्दी झाली होती. डोंगरावर एक किलोमीटर पेक्षा जास्त रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुचाकी व चारचाकी वाहनांची भली मोठी रांग लागली होती. काल्याचे कीर्तन संपताच भोजन मंडपात व मुख्य मंडपात महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. लवकरात लवकर मंदिर निर्माणाचे कार्य पूर्णत्वास जावो व या भव्य-दिव्य मंदिराचा कळस लवकरात लवकर पाहण्याचे भाग्य आम्हांला लाभो असे तुकोबारायांना साकडे घालीत हजारो भाविकांनी साश्रू नयनांनी भंडारा डोंगराचा निरोप घेतला.

श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे विश्वस्त व कीर्तनकार, प्रवचनकार, हभप रवींद्र महाराज ढोरे यांची नात व इंदुरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री नंदकुमार ढोरे यांची सुकन्या कु. अपूर्वा नंदकुमार ढोरे (एम.एस्सी.- सूक्ष्म जीवशास्त्र) यांनी सार्थ ज्ञानेश्वरीचे मुक्त चिंतनातून इंग्रजीत भाषातंर केले असून सदर हस्तलिखित सार्थ ज्ञानेश्वरीचे प्रकाशन हभप रविदास महाराज शिरसाठ यांच्या शुभ्हास्ते, ट्रस्टच्या सर्व पदाधिका-यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.