Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Pckhabar- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन अगदी जल्लोषात साजरे झाले. यावेळी प्राथमिक विभागातील इ. पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून स्नेहसंमेलनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

*’मिले सूर मेरा तुम्हारा’* या संकल्पनेवर आधारित भारतातील सर्वच राज्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. भारतातील राज्यांमध्ये आढळणारी भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक विविधतेतील एकता यावेळी अधोरेखित करण्यात आली. इ. पाचवीतील अथर्व हिंगे व तेजश्री कुऱ्हाडे यांनी सूत्रधाराची भूमिका बजावत *’मिले सूर मेरा तुम्हारा’* ही संकल्पना मांडली.

भारतातील जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बंगाल, सेव्हन सिस्टर्स, ओडिसा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, गोवा, गुजरात, महाराष्ट्र या सर्वच राज्यांमध्ये आढळणारी विविधता विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या सादरीकरणातून दाखवून दिली. गणेशवंदनेने इ. पहिलीतील विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाची धमाकेदार सुरुवात केली तर ग्रॅण्ड फिनाले मध्ये इ. चौथीतील विद्यार्थ्यांनी मूल आणि आई, मूल आणि कुटुंब, मूल आणि शाळा, मूल आणि समाज यांतील सूर जुळल्या वरच *’वसुधैव कुटुंबकम् ‘* हे मूल्य रुजले जाते हे आपल्या सादरीकरणातून दाखवून देत प्रेक्षकांची मने जिंकली.

भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशिद, कुलस्वामिनी महिला मंच मावळच्या संस्थापक, अध्यक्षा सौ. सारिका सुनील शेळके, देहू देवस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे व त्यांच्या पत्नी सौ. रेणुका पुरुषोत्तम मोरे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. योगाचार्य दत्तात्रय भसे, ज्योतिषाचार्य दत्तात्रय अत्रे, माजी सरपंच अशोकराव मोरे, कृष्णाजी परंडवाल‌, अंकुश गोरडे, नरसिंग नरवटे, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, उपाध्यक्ष अशोक कंद आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. स्केटिंग मधील बक्षीसपात्र दहा विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच माघ शुद्ध दशमीला भंडारा डोंगर यात्रेनिमित्त तीन दिवस अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या बसेसची यात्रेकरूंसाठी मोफत सोय करण्यात आली होती. बसचालकांनी ही सेवा सलग तीन दिवस दिल्यामुळे त्यांच्या या सेवा कार्याचा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी केले. शाळेची प्रगती तसेच शाळेतील वेगवेगळे उपक्रम सांगत त्यांनी वार्षिक अहवालाचा धावता आढावा घेतला. सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी यावेळी पालकांशी संवाद साधला. इ. पाचवीतील दुर्वा काळुंके हिने सूत्रसंचालन केले तर इ. तिसरीतील पार्थ गरजे याने आभारप्रदर्शन केले.