Maval news: सलग आलेल्या सुट्यांमुळे मावळात पर्यटकांची गर्दी, महामार्गावर वाहतूक कोंडी

 

Maval news: सलग आलेल्या सुट्यांमुळे मावळात पर्यटकांची गर्दी, महामार्गावर वाहतूक कोंडी
Pckhabar- नाताळ, शनिवार आणि रविवार अशा सलग आलेल्या सुट्ट्या तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक घराबाहेर पडल्याने मावळ तालुक्यातील गड-किल्ले, धार्मिकस्थळे, आणि पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग, तळेगाव चाकण महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

नाताळच्या पूर्वसंध्येपासून मावळत पर्यटक पर्यटनासाठी दाखल झालेले होते. लोणावळा, खंडाळा, पवनानगर, लोहगड, विसापूर, तुंग या गडावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. तर बेडशे, कार्ला, भाजे या लेण्याच्या परिसरात पुण्या-मुंबईचे अनेक पर्यटक दाखल झाले होते. आंदर मावळ, पवन मावळ, नाणे मावळ येथे गर्दी झाली होती. घोरवडेश्वर, प्रतिशिर्डी, शिरगाव, प्रतिपंढरपुर, दुधिवरे, भंडाराडोंगर या धार्मिक स्थळी भाविकांनी तसेच पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.

पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. तर महामार्गावर हॉटेल, धाबे, गर्दीने भरून गेले होते. याशिवाय खाद्यपदार्थांची दुकानेही सजली होती. पुणे-मुंबईवरून येणारे बहुतेक पर्यटक, भाविक हे चारचाकी वाहनातून स्थळाजवळ आल्याने पार्किंगचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

नाताळच्या सुट्ट्या आणि थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी मावळात गर्दी होण्याची शक्यता आहे. पुणे-मुंबईच्या पर्यटकांची एक दिवशीय सहल साजरी होते. साध्य रेल्वे बंद असल्याने बहुतेक पर्यटक हे चारचाकी गाडीतून येताना दिसत आहे. गावातील बहुतेक हॉटेल, रिसॉर्ट आणि धरण परिसरातील ऍग्री टुरिझम केंद्र या ठिकाणी पर्यटकांनी आगाऊ बुकिंग केल्याने हाऊसफुल झालेले आहेत. हजारोंच्या संख्येने पर्यटक आले असल्याने पोलिस यंत्रणेवर मोठा ताण आलेला असून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. मावळातील शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला या गर्दीचा त्रास होत आहे.

सर्वाधिक गर्दी लोणावळा-खंडाळा कार्ला, भाजें,पवनानगर परिसर, लोहगड, विसापूर, तुंग हे गडकिल्ले तर घोरवडेश्वर, शिरगाव, शिर्डी, प्रतिपंढरपुर, दुधिवरे येथे झालेली होती.