Sports news: दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व; ऑस्ट्रेलियाला दोनशेच्या आत गुंडाळले

Sports news: दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व; ऑस्ट्रेलियाला दोनशेच्या आत गुंडाळले
Pckhabar-टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा झलक अनुभवायला मिळाली.  गोलंदाजांचा योग्य वापर करताना त्यानं ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. पदार्पणवीर मोहम्मद सिराजनं प्रभावित केले, आर अश्विननं ऑसींचे कंबरडे मोडले. जसप्रीत बुमराहनं शेपूट गुंडाळून ऑस्ट्रेलियाला दोनशेच्या आत समाधान मानण्यास भाग पाडले. मात्र, भारताची सुरुवात निराशाजनक झाली.

मयांक अग्रवाल भोपळ्यावर माघारी परतला, परंतु शुबमन गिल व चेतेश्वर पुजारानं दिवसअखेर खिंड लढवली. भारतानं १ बाद ३६ धावा केल्या.

जसप्रीत बुमराहनं पाचव्या षटकात ऑसींना पहिला धक्का दिला. जो बर्न्स त्यानं ( ०) यष्टिरक्षक रिषभच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवले. अश्विननं १३व्या षटकात ऑसींचा सलामीवीर मॅथ्यू वेडला ( ३०) माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर अश्विननं स्टीव्ह स्मिथला फोडू न देताच तंबूत पाठवले. ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ३८ अशी झाली होती. पण, लाबुशेन व हेड यांनी डाव सावरला. खेळपट्टीचा बदललेला अंदाज पाहता कर्णधार अजिंक्यनं पुन्हा बुमराहच्या हाती चेंडू सोपवला आणि त्याचा हाही डाव यशस्वी ठरला. बुमरानं हेडला ( ३८) माघारी जाण्यास भाग पाडले. अजिंक्यनं स्लीपमध्ये सुरेख झेल टिपटून हेड व लाबुशेन यांची ८६ धावांची भागीदारी संपुष्टात आणली.

मोहम्मद सिराजनं पदार्पणात पहिली विकेट घेतली. लाबुशेनला ४८ धावांवर त्यानं शुबमन गिलकरवी झेलबाद केले. दोन्ही पदार्पणवीरांनी टीम इंडियाला हे यश मिळवून दिलं. टी ब्रेकनंतर ऑसींना एकामागून एक धक्के देताना आणखी तीन फलंदाज बाद केले. अश्विननं टीम पेनला बाद करून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. टीम इंडियानं ऑस्ट्रेलिाचा पहिला डाव १९५ धावांवर गुंडाळला. जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. आर अश्विननं ३५ धावांत ३, तर मोहम्मद सिराजनं ४० धावांत २ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानं एक विकेट घेतली.