Pimpri News : पीसीएमसीचे कृतज्ञतेचे ‘तू करदाता, तू करविता अभियान

Pimpri News : पीसीएमसीचे कृतज्ञतेचे ‘तू करदाता, तू करविता अभियान

नावीन्यपूर्ण अभियानातून ‘करदात्यांबद्दल’ होणार कृतज्ञता व्यक्त…

‘मिम्स’, ‘रील्स’ अभियानांनंतर आता नागरिकांच्या मनाचा ठाव घेणारे अभियान

Pckhabar- नागरिकांना महापालिकेच्या सेवांचा लाभ मिळावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नावीन्यपूर्ण उपक्रम रावबित आहे. महापालिकेच्या करसंकलन विभागाद्वारे नागरिकांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी ‘मिम्स’ नंतर ‘रील्स’ स्पर्धेतून आवाहन करण्यात आले. नावीन्यपूर्ण उपक्रमांना करदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराचा भरणा केला. करदात्यांनी प्रामाणिकपणे कराचा भरणा केल्यानंतर महानगरपालिका जबाबदार करदात्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘तू करदाता, तू करविता’ (‘इच वन थॅंक वन’) अभियानातून करदात्यांचे आभार व्यक्त करणार आहे.

जन्मापासून ते मृत्यूपर्यंत दैनंदिन गरजांसाठी सामान्य नागरिकांच्या आयुष्यात महानगरपालिकेसारखी मातृसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते. महानगरपालिकेला कोणतीही सेवा देण्यासाठी निधीचे संकलन करणे अत्यावश्यक असते. महापालिकेचा करसंकलन विभागाच्या मालमत्ता कराचा महापालिकेच्या निधीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. ‘लोकांसाठी आम्ही’ या तत्त्वाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आजपर्यंत वाटचाल केली असून, आता जागरूक करदात्यांनी प्रामाणिकपणे भरलेल्या कराचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या समोर ‘तू करदाता, तू करविता’ (‘इच वन थॅंक वन’) अभियानातून मांडला जाणार आहे. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या अभियानातून करदात्यांचे आभार व्यक्त करण्यात येणार आहेत.

नागरिकांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांमधून जीवनमान उंचावण्याबरोबरच शहराचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी आज सजग करदात्यांचा सहभाग मोलाचा आहे. चालू आर्थिक वर्षात महानगरपालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने पहिल्या चार महिन्यांतच तब्बल ५०० कोटींचा कर संकलित केला असून, याबाबत महानगरपालिका करदात्यांबाबत अभियानाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करणार आहे. त्यासोबतच नागरिकांनी प्रामाणिकपणे भरलेल्या कराचा सामान्य गोरगरीब नागरिकांना कोणत्या प्रकारे लाभ मिळाला, याचा लेखाजोखा करसंकलन विभागाद्वारे जनतेसमोर अभियानाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय सोयी-सुविधा, शैक्षणिक आर्थिक साहाय्य, गरजू नागरिक, अपंग, महिला, बालक यांना मिळणाऱ्या सवलती, अनुदान, मागासवर्गीयांसाठीच्या कल्याणकारी योजनांतून ज्या नागरिकांनी लाभ घेतला आहे, अशा नागरिकांची करदात्यांबद्दल असणारी कृतज्ञता विभागाद्वारे जनतेसमोर मांडण्यात येणार आहे.यासाठी समाज माध्यमे, बातम्या, व्हिडिओज, ऑडियो, पोस्टर्स अशी विविध साधने वापरण्यात येतील.

तू करदाता, तू करविता; तू शहराचा भाग्यविधाता

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चालू वर्षात करवसुलीचे रेकॉर्ड नोंदविले आहेत. करवसुलीच्या रेकॉर्डमध्ये प्रामाणिक नागरिकांमुळे पहिल्या चार महिन्यांतच विक्रमी कराची वसुली झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीमध्ये वाढ झाली असून, संबंधित निधीचा वापर शहराच्या विकासासाठी होणार आहे. नागरिकांना मूलभूत गरजांपासून ते पायाभूत सुविधा देण्याचे काम पालिकेचा प्रत्येक विभाग करीत आहे. आज जागरूक नागरिकांनी मालमत्ताकराचा विक्रमी भरणा केल्यामुळे महापालिका, ‘करदात्यांना तू शहराचा करविता आणि तू शहराचा भाग्यविधाता’ म्हणून त्याचा सन्मान करीत आहे. ‘तू करदाता, तू करविता’ (‘इच वन थॅंक वन’) अभियानामार्फत करदात्यांचा सन्मान करताना पालिकेची करदात्यांप्रती कृतज्ञतेची भावना आहे. महापालिकेने सोशल मीडियाच्या माध्यमातून करदात्यांचे आभार व्यक्त करण्याचे अभियान सुरू केले असून, पालिकेच्या नावीन्यपूर्ण अभियानामध्ये ‘तू करदाता, तू करविता’ (‘इच वन थॅंक वन’) अभियान नागरिकांच्या मनाचा ठाव घेणारे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही एक स्वायत्त संस्था असून, ती शहराची पालकसंस्था म्हणून आज शहराच्या विकासामध्ये मोलाचा वाटा उचलत आहे. जागरूक नागरिकांनी गतवर्षी व चालू आर्थिक वर्षात आपले कर्तव्य बजावून मालमत्ताकराचा भरणा केला आहे. या जागरूक नागरिकांना त्यांचा कर शहराच्या विकासासाठी लागतो आहे, हे महापालिका म्हणून आम्ही सांगणे आमचे कर्तव्य आहे. त्याच धर्तीवर ‘तू करदाता, तू करविता’ (‘इच वन थॅंक वन’) अभियानातून करदात्यांचे आभार मानताना, पालिकेचे कार्य सांगण्याचा व त्यातून सामान्य नागरिकांच्या जीवनमानात झालेला बदल नागरिकांच्या समोर मांडण्यात येणार आहे. सुप्रशासनाचे (गुड गव्हर्नन्स) हे एक महत्त्वाचे अंग आहे. नागरिकांप्रती पालिकेचे असलेले उत्तरदायित्व अधोरेखित करण्याचा हा आमचा एक नम्र प्रयत्न आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिक

कर संवाद, 24X7 हेल्पलाईन सारख्या माध्यमातून कर संकलन विभाग नागरिकांशी संवाद साधत आला आहे. पण नागरिकांप्रति असलेली बांधिलकी वाढवायची असेल तर नवनवीन संवादाचे पुल बांधणे आवश्यक आहे. हे अभियान त्याचाच एक भाग आहे. माननीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू केलेले आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे.

:- नीलेश देशमुख
सहायक आयुक्त
पिंपरी चिंचवड महानगरपालिका