Dehu News : श्रीक्षेत्र देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पालक-शिक्षक-विद्यार्थी यांच्या संयुक्त कृतीने शिक्षक दिन साजरा..!

Dehu News : श्रीक्षेत्र देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पालक-शिक्षक-विद्यार्थी यांच्या संयुक्त कृतीने शिक्षक दिन साजरा..!

७८ पालकांचा एक दिवसीय शिक्षक उपक्रमात सहभाग
Pckhabar- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज शिक्षक दिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या संकल्पनेतून पालक-शिक्षक-विद्यार्थी-शाळा यांच्यात सूर जुळून यावेत म्हणून पालकांना एक दिवसीय शिक्षक होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या हाकेला पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. जवळजवळ ७८ पालकांनी या एक दिवसीय शिक्षक उपक्रमात सहभाग घेतला.

प्रत्यक्ष पालकांनी शाळेत येऊन ज्ञानदानाचे कार्य करीत अध्यापनातील आनंद लुटला. कोणी माहिती सांगून, कोणी खेळातून, कोणी विद्यार्थी कृतीतून आपापल्या ज्ञानदानाचे कसब दाखविले व काही तासांसाठीची शिक्षकाची भूमिका अगदी निष्ठेने वठवली. याबरोबरच आज प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या शिक्षक सन्मान सोहळ्याप्रसंगी देहू देवस्थानचे अध्यक्ष हभप. पुरुषोत्तममहाराज मोरे, काटे उद्योगसमूहाचे प्रमुख रमेशशेट काटे, प्राथमिक आरोग्य केंद्र देहूचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, युनियन बँक देहू शाखेचे मॅनेजर श्री अंकित माने, सेवानिवृत्त शिक्षक श्री. रमेश मिरजकर सर, सृजन फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार ॲड. संजय भसे, महिंद्रा लाॅजिस्टिकचे कामगार नेते श्री. आप्पा पाडेकर, युवा उद्योजक श्री. कैलास येळवंडे या मान्यवरांच्या हस्ते ५९ शिक्षकांचा गुलाबपुष्प व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर मॅडम यांनी प्रत्येक शिक्षकाचे मुल्यांकन करीत या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर प्रत्येकाची गुणवैशिष्ट्ये समर्पक शब्दांत लिहिली होती. शिक्षकांवर प्रेम आणि संपूर्ण निष्ठा ठेवा असे मत हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी व्यक्त केले. तळेगाव येथील शाळेत १८ वर्षे शारिरीक शिक्षण हा विषय शिकविण्याचा दांडगा अनुभव असलेले देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तममहाराज मोरे हे एक आदर्श शिक्षक आहेत. आजच्या दिवशी शिक्षक सन्मान सोहळ्याप्रसंगी त्यांची उपस्थिती लाभण्याचा एक दुहेरी योग जुळून आला. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी बोधकथेतून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी आज विद्यार्थ्यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. पाचवीतील दुर्वा काळुंके, आरोही मारणे, आराध्या पाटील, नंदिनी सूळ, श्रेया दिवे, अनन्या गायकवाड, वेदांत शेळके या विद्यार्थ्यांनी केले. तसेच अथर्व फटांगडे याने आभारप्रदर्शन केले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळा प्रशासनाने सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच एक दिवसीय शिक्षक-पालक यांच्यासाठी स्नेहभोजनाची सोय केली होती.