Pune news : ‘पवार साहेब तुम्ही पावसात भिजलात, आम्ही आज घामाने भिजलोय: आम्हाला न्याय द्या’ : MPSC विद्यार्थ्याची आर्त हाक

Pune news : ‘पवार साहेब तुम्ही पावसात भिजलात, आम्ही आज घामाने भिजलोय: आम्हाला न्याय द्या’ : MPSC विद्यार्थ्याची आर्त हाक
Pckhabar- ‘एमपीएससी’ची (MPSC) पूर्व परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकल्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आल्याने राज्यभरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबादमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत. ठरलेल्या वेळेतच परीक्षा घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

परीक्षा पुढं ढकलून सरकार आमच्या भविष्याशी खेळतंय असा संताप विद्यार्थी व्यक्त करत आहेत. पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनात एका विद्यार्थ्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.

“शासनानं परीक्षा पुढं ढकलल्या. पण आमच्या आई-वडिलांनी आम्हाला यावेळी अधिकारी होऊन ये याच इच्छेनं आम्हाला पाठवले. माझी आई रडली होती. तिनं सांगितलं होती की यावेळी तू अधिकारी झाला पाहिजे. मी माझ्या आईला आश्वासन देऊन आलो होतो की मी अधिकारी होणार. पवार साहेब तुम्ही पावसात भिजलात हे या महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्यानं अन् विद्यार्थ्यानं पाहिलं. आज आम्ही घामानं भिजलोय. आज विद्यार्थी रडतोय. पवार साहेब तुम्ही याच्याकडे लक्ष द्या आणि आम्हाला न्याय द्या”, अशी आर्त हाक एका विद्यार्थ्यानं ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.