Lonavala news: राजमाची किल्ल्यावर कॅम्पिंगसाठी आलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू

 

Lonavala news: राजमाची किल्ल्यावर कॅम्पिंगसाठी आलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू
Pckhabar-जंगल ट्रेकिंग आणि कॅम्पिंग साठी प्रसिद्ध असलेल्या राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या उदयसागर या तलावात बुडून एका एकवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार सदर युवकाचे नाव कौशिक अय्यर असे असून तो ठाकुर्ली, ठाणे येथील रहिवासी होता. शनिवारी राजमाची येथे कॅम्पिंग करण्यासाठी इतर ७० मुलांच्या गटासोबत तो रायगड जिल्ह्यातील राजमाची डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कोंडीवडे या गावातून ट्रेकिंग करीत राजमाची गावात आला होता. त्याठिकाणी गावापासून काही अंतरावर असलेल्या उदयसागर या छोट्या तलावावर सर्वजण फिरण्यासाठी गेले असता संध्याकाळी ६ वाजता इतर काही मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी कौशिक याने तलावाच्या काठावर असलेल्या भिंतीवरून तलावात सूर मारला. मात्र त्याठिकाणी तलाव उथळ असल्याने त्याच्या डोक्याला मार लागला आणि तो पाण्यात बुडाला. इतरांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो मिळून आला नाही.

सदर घटना कामशेत पोलीस ठाण्यात समजताच स.पो.नि. कदम यांच्या नेतृत्वाखाली पो.ना.महेश दौंडकर, धेंडे व वाळुंजकर यांनी राजमाची गाठली. मात्र खूप रात्र झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. आज रविवारी सकाळी पोलिसांनी स्थानिक राजमाची ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा शोधकार्य सुरू केले असता सकाळी ९.३० वाजण्याच्या कौशिक याचा मृतदेह पाण्यात मिळून आला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.