Pimpri Crime news: डेटिंग अ‍ॅपवरून संपर्क साधून तरूणांना लुबाडणारी उच्चशिक्षित तरूणी गजाआड

 

Pimpri Crime news: डेटिंग अ‍ॅपवरून संपर्क साधून तरूणांना लुबाडणारी उच्चशिक्षित तरूणी गजाआड
Pckhabar-बंबल-बी आणि टिंडर या डेंटिग साईटवरून तरूणांना आपल्या जाळ्यात ओढून भेटण्यास बोलवून गुंगीचे औषध देऊन लुबाडणार्‍या उच्चशिक्षित तरूणीला गुन्हे शाखेच्या युनिट-चारच्या पथकाने अटक केली. तिने एका वर्षांत तब्बल 16 तरूणांना गंडविले असून तिच्याकडून 15 लाख 25 हजारांचा ऐवज जप्त केला.

सायली ऊर्फ शिखा देवेंद्र काळे (वय-टेरेस प्लॅट, राधिका अपार्टमेंट, साधु वासवानी रोड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपी तरूणीचे नाव आहे.

याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आरोपी सायलीचे बीसीए झाले असून तिच्या वडिलांचे दहा वर्षांपुर्वीच निधन झाले आहे. तर तिच्या आईला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. डॉक्टरांनी तिच्या आईला दिलेल्या झोपेच्या दिलेल्या गोळ्यांचा सायली तरूणांना देत लुबाडत होती. रास्ता पेठेतील एका सोनाराला वडिल सेवानिृत्त कर्नल असून त्यांना कॅन्सर झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगून चोरीचे दागिने गहाण ठेवले.  
10 डिसेंबर रोजी रावेत येथील एका युवकाला बंबल डेटिंग अ‍ॅपवरून आरोपीने संपर्क साधत त्याच्या घरी तरूणी आली होती. त्याच्या पेयामध्ये गुंगीचे औषध टाकून त्याच्याकडील 1 लाख 85 हजारांचा ऐवज लुबाडून तरूणी पसार झाली होती. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पोलिसांनी अधिक तपास करण्यासाठी गुन्हे शाखा चारकडे तपास सोपविला. सहायक पोलीस निरीक्षक अंबरिश देशमुख यांनी तांत्रिक तपास करत बंबल अ‍ॅपवर स्वतःचे खोटे प्रोफाईल तयार करून आरोपीला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविली. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पुन्हा 17 जानेवारी रोजी पुन्हा तसाच प्रकार वाकड परिसरात घडला. दरम्यानच्या काळात तरूणीने फे्रन्ड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केल्याने तिला वाकड येथील भुमकर चौकात भेटालया बोलवून सापळा रचून तरूणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडे पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर तिने पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील 16 तरूणांना अशाच प्रकारे गंडविले आहे. आरोपी तरूणी लुबाडलेल्या तरूणाचे मोबाईलवरून अ‍ॅपवरील खाते बंद करून मोबाईल फोडून टाकून देत पुरावा नष्ट करत होती. तिच्याकडून 15 लाख 25 हजारांचे सोन्याचे दागिने, 1 मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधिर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे, अंबरिश देशमुख, धर्मराज आवटे आदींच्या पथकाने केली आहे.