Dehu News : योगाभ्यासातून बुद्धिमत्ता वाढू शकते – योगाचार्य ऋषी धर्मज्योती डॉ. विश्वास मंडलीक

Dehu News : योगाभ्यासातून बुद्धिमत्ता वाढू शकते – योगाचार्य ऋषी धर्मज्योती डॉ. विश्वास मंडलीक

अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल व योग विद्या धाम श्रीक्षेत्र देहू यांच्या सहकार्यातून विद्यार्थी व पालकांसाठी व्याख्यान

Pckhabar- ‘विद्यार्थी जीवनात योग साधनेचे महत्व’ या विषयावरील व्याख्यानात पंतप्रधान योग पुरस्काराने सन्मानित योगाचार्य ऋषी धर्मज्योती डॉ. विश्वास मंडलीक गुरुजींनी पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना योगाभ्यासातून बुध्दीमत्ता वाढू शकते असे प्रतीपादन केले.

सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल व योग विद्या धाम श्रीक्षेत्र देहू यांच्या सहकार्यातून विद्यार्थी व पालक यांना जीवनातील योग साधनेचे महत्त्व समजण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात गुरुजींनी योग साधनेतून विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढू शकते हे सांगत शरीर, मन आणि आत्म्याचा विकास साधण्यासाठी योग साधना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते, हे सांगितले. पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतात. या संस्कारांच्या जोडीलाच योगाभ्यासाचे धडेही विद्यार्थ्यांकडून गिरवायला हवे, असेही ते पुढे म्हणाले.

ग्रहण, आकलन व स्मरण या ज्ञानाच्या टप्प्यांना आत्मसात करताना  विद्यार्थ्यांनी स्वतः ला ॐकाराची  सवय लावावी, यासाठी त्यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांकडून ११ वेळा ॐकाराची साधना करून घेतली. ॐकार म्हणण्याची योग्य पद्धत गुरुजींनी सोप्या भाषेत पालकांना व विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. प्रश्नोत्तराच्या टप्प्यात पालकांनी व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे गुरुजींनी निरसन केले.  यावेळी डॉ.रमेश मंत्री यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सृजन फाउंडेशनचे सदस्य सौरभ कंद यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करुन दिला. यावेळी श्रीक्षेत्र देहूतील योग विद्या धाम चे प्रमुख, गुरुवर्य दत्तात्रय भसे, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, सचिव प्रा. विकास कंद उपस्थित होते. अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उपप्राचार्या शैलजा स्वामी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहशिक्षिका वृषाली आढाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर रेखा जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.
इयत्ता पहिली ते पाचवी चे विद्यार्थी तसेच प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पालक, शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होते.