Chinchwad News : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

Chinchwad News : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्यांवर
खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

Pckhabar- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाईफेक करणाऱ्यासह त्याच्या दोन सहकाऱ्यांवर चिंचवड पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील हे शनिवारी (दि.10) पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. ते चिंचवड येथील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला जात होते. त्यावेळी समता सैनिक दलाचे मनोज भास्कर गरबडे (वय-34, रा. गोकुळ हॉटेलजवळ पिंपरी) यांनी चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकली. चिंचवड पोलिसांनी त्याला तेथेच पकडून ताब्यात घेतले होते.

मनोज गरबडे याच्यासह त्याचे दोन साथीदार धनंजय भाऊसाहेब इजगज (वय-39 आणि विजय धर्मा ओव्हाळ (वय-40, दोघेही रा. आनंदनगर, चिंचवड) यांनाही पोलिसांनी अटक केली होती. धनंजय इजगज हे सुद्धा समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आहेत. तसेच विजय ओव्हाळ हे वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे शहर सचिव असल्याचे समोर आले आहे.
या तिघांवर कलम 307 सह 353, 294,500, 501, 120 (ब) 34 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम 7, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)/135 अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडे अधिक तपास करत आहेत.

दरम्यान,शाईफेक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांवर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली  पोलीस यंत्रणेने टाकलेले चुकीचे गुन्हे मागे घेण्यासाठी शहरातील सर्व आंबेडकरी संघटना आणि इतर पक्ष आक्रमक झाले आहेत.