संशयित चोरट्याच्या मृत्यू प्रकरणी तिघांवर गुन्हा

ही बातमी शेअर करा.

संशयित चोरट्याच्या मृत्यू प्रकरणी तिघांवर गुन्हा

 Pckhabar- घरात चोरी करण्यासाठी चोर आला असल्याच्या संशयावरून तिघांनी संशयित चोरट्याला बांधून लाथाबुक्यांनी, हाताने मारहाण केली. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्याच्या मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पहाटे सव्वा पाच वाजता फुगे माने तालीम जवळ भोसरी येथे घडली.

याप्रकरणी  पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नारायण विठोबा फुगे (वय 60), गणेश विठोबा फुगे (वय 32), कुणाल विठोबा फुगे (वय-28, तिघे रा. फुगे माने तालीम जवळ, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर महादेव हौसे (वय 36, रा. दिघी. मूळ रा. चिंचोली,जि. बीड) असे मृत्यू झालेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास मयत शंकर आरोपी यांच्या घरात आला. आरोपींनी त्याला चोर समजून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बांधून ठेवले. घाबरलेला संशयित चोर बांधून ठेवलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला असता मृत्यूचे कारण समोर आले. शंकर याच्या हृदयाभोवती पाणी झाले. त्याचा दाब पडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात नारायण विठोबा फुगे (वय 60) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंकर महादेव हौसे (वय 36) याच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.


ही बातमी शेअर करा.