Pimpri News: कन्या विद्यालयात रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांना विनम्र अभिवादन

Pimpri News: कन्या विद्यालयात रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांना विनम्र अभिवादन

“निजदेहाचे झिजवून चंदन
तुम्ही वेचिला येथे कण कण
स्मृतीस तुमच्या शतशः वंदन”

Pckhabar-रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आज शुक्रवार रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहधर्मचारिणी तथा रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रथम विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका शारदा शेटे व विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांचे शुभहस्ते लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विद्यालयातील सर्व अध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करताना विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी लक्ष्मीबाईंच्या श्रम, समता व स्वावलंबन या तीन तत्वांवर आधारलेल्या शैक्षणिक कार्याची माहिती व्यक्त केली तसेच गोरगरिबांच्या मुलांना शिकविण्याचे भाऊरावांचे कार्य म्हणजे ध्येयसाधनेचा एक प्रचंड यज्ञच होता व या यज्ञात लक्ष्मीबाईंनी तन मन व धनाने स्वजीविताची पर्वा न करता अविरत श्रमांची आहुती दिली. म्हणूनच आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून आज रयत शिक्षण संस्था नावाजली जाते असे मनोगत व्यक्त केले.

यानंतर विद्यालयातील विद्यार्थीनी सौरभी सोनवणे , अंजली सुरडकर, सिद्धी खराडे, रोहिणी जेटीथोर, स्वप्नाली कांबळे यांनी लक्ष्मीबाईंचा शैक्षणिक कार्यातील सिंहाचा वाटा, गोरगरिबांच्या मुलांविषयी वाटणारी तळमळ व विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार याविषयी माहिती देत मनोगत व्यक्त केले.

यानंतर विद्यालयातील उपशिक्षक राशिनकर प्रवीण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लक्ष्मीबाईंच्या ठिकाणी असलेल्या मातृत्व व दातृत्व या गुणांचा सुरेख संगम व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा रांगणेकर यांनी केले व विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी विद्यालयातील विद्यार्थिनींना- लक्ष्मीबाईंच्या कार्यातून बोध घेऊन आजच्या युगातील लक्ष्मीबाई, जिजाबाई, झाशीची राणी, सावित्रीबाई बना असा संदेश देत उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *