Dehu News : ‘जीवनगाथा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आरोग्यदूताशी संवाद

Dehu News : ‘जीवनगाथा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आरोग्यदूताशी संवाद
सृजन फाऊंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘जीवनगाथा’
Pckhabar- श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाऊंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘जीवनगाथा’ या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील तृतीय पुष्प शनिवार, दि.१ ऑगस्ट २०२६ रोजी गुंफण्यात आले. या वेळी इ. सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नवनाथ शेळके यांची मुलाखत घेत आरोग्य, शिक्षण आणि जीवनमूल्यांचा अनोखा संगम अनुभवला.

विज्ञान विषयातील ‘आरोग्य’ या अभ्यासघटकावर आधारित या मुलाखतीत विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी जीवनशैली, विविध आजारांची कारणे व प्रतिबंध, मोबाईलच्या अतिवापराचे परिणाम, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)चे बदलते स्वरूप तसेच डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असलेली तयारी अशा विविध विषयांवर उत्स्फूर्त प्रश्न विचारले. डॉ. शेळके यांनी आपल्या अनुभवांच्या आधारे प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर व प्रेरणादायी उत्तर देत विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत सजग राहण्याचा संदेश दिला.

इयत्ता आठवी ‘ब’ मधील ऐश्वर्या कारंडे हिने मुलाखतकाराची भूमिका समर्थपणे पार पाडली, तर रुद्र पाटील याने डॉ. शेळके यांचा परिचय करून दिला.

यावेळी डॉ. नवनाथ शेळके यांनी आपल्या संघर्षमय प्रवासातील अनुभव कथन करत समर्पण, सेवाभाव, करुणा, शिस्त आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना दिला. निरोगी जीवनशैली आणि समाजसेवेची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निर्माण व्हावी, असे आवाहनही त्यांनी केले.

अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘जीवनगाथा’ या उपक्रमामध्ये इ. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाशी संबंधित विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखती आयोजित केल्या जातात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा जीवनप्रवास जाणून घेण्याची संधी मिळते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला सकारात्मक दिशा मिळते.

या कार्यक्रमास शारदा फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. शंभू कोतले, देहू वि.का.स. सोसायटीचे व्हाॅ. चेअरमन नारायण पचपिंड, सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा.विकास कंद, शिक्षकवृंद तसेच इ.सातवी व आठवीतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन इ.आठवी ‘ब’ मधील श्रेया दिवे हिने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *