Dehu News : जीवनगाथा उपक्रमातून विद्यार्थ्यांचा एवरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्याशी प्रेरणादायी संवाद

Dehu News : जीवनगाथा उपक्रमातून विद्यार्थ्यांचा एवरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्याशी प्रेरणादायी संवाद

Pckhabar- श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाऊंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘जीवनगाथा… साधूया संवाद यशस्वी वाटचालीसाठी!’ या उपक्रमाचा शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शुभारंभ एवरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या प्रेरणादायी मुलाखतीने उत्साहात झाला.

या उपक्रमांतर्गत इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याच्या एका शनिवारी विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तिमत्त्वांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी निमंत्रित केले जाते. यावर्षीच्या पहिल्या सत्रात इयत्ता आठवीच्या मराठी अभ्यासक्रमातील ‘गिर्यारोहणाचा अनुभव’ या पाठाच्या अनुषंगाने अनुभवी गिर्यारोहक श्रीहरी तापकीर यांच्याशी विद्यार्थ्यांनी थेट संवाद साधला.

या मुलाखतीचे संपूर्ण नियोजन विद्यार्थ्यांनीच केले. इयत्ता आठवीतील चिंतन कोळगे याने मुलाखतकाराची भूमिका प्रभावीपणे पार पाडली, तर अथर्व फटांगडे याने श्रीहरी तापकीर यांचा परिचय करून दिला. यानंतर इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत त्यांच्या जीवनप्रवासातील अनेक प्रेरणादायी पैलू जाणून घेतले.
बालपण, शालेय व महाविद्यालयीन जीवन, गिर्यारोहणाची आवड, सह्याद्रीतील मोहिमा, एवरेस्ट सर करण्याचे स्वप्न आणि ते साकार करण्यासाठी केलेला संघर्ष याविषयी श्रीहरी तापकीर यांनी ओघवत्या शैलीत अनुभव कथन केले. त्यांच्या एव्हरेस्ट मोहिमेतील रोमांचकारी प्रसंगांनी विद्यार्थी भारावून गेले. यावेळी त्यांनी सह्याद्री व एव्हरेस्टवरील गिर्यारोहणाच्या व्हिडिओ क्लिप्सही विद्यार्थ्यांना दाखवल्या.

जीवनात मोठे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी चिकाटी, कठोर परिश्रम आणि संघर्षाची तयारी आवश्यक असते, हा मोलाचा संदेश या संवादातून विद्यार्थ्यांना मिळाला.

कार्यक्रमास शाळेच्या उपप्राचार्या शैलजा स्वामी, सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन इयत्ता आठवीतील दुर्वा काळुंके हिने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *