Dehu News : अभंग स्कूलमध्ये देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Dehu News : अभंग स्कूलमध्ये देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Pckhabar- श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाऊंडेशन संचलित अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. रिमझिम पावसाची तमा न बाळगता इयत्ता चौथी ते आठवीचे विद्यार्थी ध्वजारोहण सोहळ्यास उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेच्या इयत्ता चौथी व सातवीच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणारे वेदांत लक्ष्मण निंबाळकर व अथर्व प्रशांत माने यांचा प्रमुख पाहुणे म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. शाळेच्या उपप्राचार्या शैलजा स्वामी व सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी पेटी व तबल्याच्या साथीने राष्ट्रगीत व झेंडा गीत सादर केले. इयत्ता सातवीची विद्यार्थिनी श्रुती शिंदे हिने भाषणातून स्वातंत्र्याचा खरा अर्थ उलगडला. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ‘या देशाचा उन्नत माथा’ हे देशभक्तिपर गीत सादर केले, तर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी अथर्व माने व वेदांत निंबाळकर यांना सृजन फाऊंडेशनचे संस्थापक कै. दशरथ बाळासाहेब कंद यांच्या स्मरणार्थ प्रत्येकी रु. ५,००० चे बक्षीस जाहीर करण्यात आले.

यावेळी बोलताना उपप्राचार्या शैलजा स्वामी म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी लहान वाटणाऱ्या चुकीच्या सवयी बदलून चांगल्या सवयी व चांगले विचार अंगीकारले पाहिजेत. यातूनच एक चांगला विद्यार्थी घडतो.”

सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद म्हणाले, “ज्याला आईचे दुःख कळते, तो कधीही आईला दुखवत नाही. जो आईला दुखवत नाही, तो आपल्या मातृभूमीलाही कधी विसरत नाही. अशा संस्कारातून शाळा, गाव व देशाचे नाव उज्ज्वल करणारा चांगला माणूस घडतो.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका प्रग्या मेहेर यांनी केले, तर महिंद्रा रणखंबे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *