Dehugaon News :देहूगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले!

Dehugaon News :देहूगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले!

उद्या होणार आरक्षण सोडत

Pckhabar- पुणे जिल्ह्यातील नव्याने निर्माण झालेल्या देहूगाव नगरपंचायतीची प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता देहूगाव नगरपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. आता खऱ्या अर्थाने नगरपंचायत निवडणुकीसाठी होणारी राजकीय रणधुमाळी रंगली जाणार आहे.

यावर्षी डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या 17 व मुदत समाप्त झालेल्या 2 आणि नवनिर्मित 7 अशा राज्यातील एकूण 26 नगरपंचायतींसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

उद्या दुपारी ( शुक्रवार)  12 वाजता नगरपंचायत कार्यालयात ही सोडत होणार आहे.  यावेळी देहूगाव नगरपंचायतीच्या  होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागासवर्ग व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यात येणार आहे. प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

शुक्रवार दि 12 नोव्हेंबर ते मंगळवार दि.16 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी आहे. त्यानंतर बुधवार दि. 17 नोव्हेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचना यावर सुनावणी होईल.

दरम्यान,  देहू ग्रामपंचायतीची मुदत दि.22 ऑगस्ट 2020 रोजी संपली आहे. शासनाने  ग्रामपंचायतीचे कामकाज पाहण्यासाठी हवेलीचे विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी संबंधित अधिकारी यांनी ग्रामपंचायत वार्ड रचना व आरक्षण प्रक्रिया पार पाडली होती. परंतु कोरोना महामारीमुळे सदरच्या निवडणूका होवू शकल्या नाही. त्यानंतर महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाने दि.8 डिसेंबर 2020 ला देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर केल्याची घोषणा केली. सध्या नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत.