Bhosari News: महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून केवळ घोषणांचा पाऊस :  विलास लांडे

Bhosari News: महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून केवळ घोषणांचा पाऊस :  विलास लांडे
Pckhabar-सत्तेत आल्यानंतर शहरातील नागरिकांना प्रत्यक्ष मदत करणे गरजेचे आहे. मात्र पिंपरी चिंचवड मधील सध्याचे सत्ताधारी केवळ घोषणांचा पाऊस पाडत आहेत. लॉकडाऊन मध्ये कष्टकऱ्यांना 3 हजार रुपये, 15 लाख लसीचे डोस देऊ, प्लाझ्मा दान करणाऱ्यांना 3 हजार रुपये आदीसह विविध घोषणा केल्या. मात्र अद्याप शहरवासीयांना त्याचा लाभच मिळाला नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जनतेची घोर फसवणुकच केली असल्याची टीका माजी आमदार विलास लांडे यांनी केली.

सत्ताधाऱ्यांनी एचए कंपनीला 25 कोटी देण्याची घोषणा केली. सध्या कंपनीला लस निर्मितीसाठी केंद्रातून  परवानगीच मिळाली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची 25 कोटींची घोषणा हवेतच विरणार असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारकडून परवानगी मिळवून देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच लॉकडाऊनमध्ये कष्टकऱ्यांना 3 हजार रुपये मदत देण्याचा गाजावाजा केला. मात्र अद्याप एक दमडीही त्यांना दिली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. कोविडच्या लसींचा साठा अपुरा पडत आहे. 15 लाख लसीचा डोस देण्याची घोषणा सत्ताधाऱ्यांनी केली. मात्र अद्याप त्याचा देखील साठा पुरेसा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेकांना पहिला डोस मिळत नाही. तर काहींना दुसरा डोसची प्रतीक्षा करावी लागत आहे.

प्लाझ्मा दान केल्यानंतर 3 हजार रुपये देऊ अशी आश्वासनाची खैरात देखील सत्ताधाऱ्यांनी केली. सध्या प्लाझ्मा वापरू नये असे तज्ञ सांगत आहेत. उपचाराची ही थेरपी देखील बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 हजार रुपये देण्याचे सत्ताधाऱ्यांना उशिरा शहाणपण सुचले. मात्र ते देखील दिले नाही. त्यामध्येही नागरिकांची फसवणूकच झाली.

एकूणच कोविडच्या नियोजनात देखील सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याचे चित्र आहे. नियोजनात विस्कळीतपणा आहे. त्यामुळे केवळ घोषणा न करता कष्टकऱ्यांना, शहरवासीयांना तात्काळ योजनांचा लाभ मिळवून द्यावा. अन्यथा जनतेची फसवणुक केल्यास जनताच सत्ता उलथवून लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा सणसणीत टोला माजी आमदार विलास लांडे यांनी दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दर आठवड्यात पुण्यात बैठका घेत आहेत. लोकांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. त्यांच्या माध्यमातून कष्टकऱ्यांना 1500 रुपयांचे अनुदान मिळाले. भविष्यातही शहरातील रखडलेले प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पार्थ दादा पवार युवा मंचच्या माध्यमातून सोडवुन कष्टकऱ्यांना न्याय देणार असल्याचे प्रतिपादन या वेळी माजी आमदार विलास लांडे यांनी केले.