‘माझे कोरोना काळातील दिवस’ : वाचा प्राचार्या विश्रांती कदम यांचे अनुभव

‘माझे कोरोना काळातील दिवस’ : वाचा प्राचार्या विश्रांती कदम यांचे अनुभव

सौ. विश्रांती जयसिंग कदम
प्राचार्य, (जिजामाता ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा)

Pckhabar-
प्रास्ताविक : कोरोना संकटाने चीनमध्ये जन्म घेतला आणि त्यानंतर एक एक करीत जगातील सर्व देश त्याने पादाक्रांत केले , त्याला आता 8 महिने झाले आहेत. सुरवातीला त्याचा पुरेसा अंदाज तर आला नाहीच पण त्याचा धोकाही कमी लोकांच्या लक्षात आला होता , त्यानंतर मात्र सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकू लागली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव मोठा पर्याय जगभर अवलंबला गेला आहे. कदाचित मानवजातीच्या ज्ञात इतिहासात या प्रकारची स्थिती पहिल्यांदाच ओढवली आहे. खरंतर, मला या संकटकाळात प्रथम आठवण झाली ती पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थुनबर्ग व तिच्या सहकार्यांची. ते पर्यावरणासाठी फक्त शुक्रवार मागत होते , विनवण्याही करत होते. कोविडने अनेक शुक्रवारसह आठवड्याचे सगळेच दिवस त्यांना दिले. या अभूतपूर्व घटनेचे विलक्षण परिणाम ही कोविडची जमेची बाजू आहे. तिच्याकडे संधी म्हणून पाहणे शहाणपणाचे ठरेल असा विचार करत असतानाच , या संकटात सारा वेळ आता कसे होईल ? याची चिंता करत बसण्यापेक्षा हा रिकामा वेळ , ‘ उद्याचा काळ कसा चांगला घडवता येईल ’ या विचारात घालवला , त्यावर कृती करण्यात घालवला. कदाचित हा काळ सक्षमतेसाठी मिळाला असेल असा सकारात्मक विचार करून कामाचे नियोजन ठरवले , त्यानुसार अंमलबजावणी केली , वेळच्यावेळी बारीकसारीक नोंदी केल्या. हे सर्व करत असताना मला आलेले अनुभव , मी केलेली धडपड मांडण्याचा येथे थोडक्यात प्रयत्न केला आहे.

कोरोना काळातील दिवस –
कोरोनासारखी भौतिक अडचण एका बाजूला संपूर्ण मानवजातीला एकाच मापात मोजत आहे. कोरोनाच्या नुसत्या येण्याने कित्येकांचे पाय जमिनीवर आले आहेत , कसलाच मोह उरला नाही त्यामुळेच आज कित्येक वर्षांनी रामायण , महाभारत , ज्ञानेश्वरी हवीहवीशी वाटू लागली आहे. इतर वेळी आपण म्हणतो मला थोडा वेळ मिळाला असता तर मी खूप काही केले असते. त्यामुळे कोरोनाकाळात वेळ मिळालाच आहे तर संतुलित आहार , व्यायाम , वाचन, छंद, अभ्यास याकरिता पुरेसा वेळ दिला. घरी मुलांच्याबरोबर ‘ थोडी गंमत करूया ’ यासारखे छोटे-छोटे उपक्रमवजा खेळ खेळले. आपल्याला वाटतात त्याहीपेक्षा मुले खूपच कल्पक असतात , फक्त त्यांना संधी देण्याची गरज असते. मला वाचण्याचीही आवड असल्याने घरातील सर्वाना यामध्ये सहभागी करुन घेतले. वाचलेल्या पुस्तकावरती चर्चा घडवून आणली. त्यावरती चिंतन-मनन करण्याची सवय मुलांना लावली. त्यातून मुलांनी आपले विचार मांडले. आपले मत चूक की बरोबर हे ठरवण्यासाठी त्यांना संधी मिळाली , स्वतःचे मत बनवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग झाला. आई-वडिल आपल्यासाठी पुरेसा वेळ देत असल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सर्व लॉकडाऊन मधील थकवा आणि कंटाळा दूर करुन गेला.

सामाजिक बांधिलकी –
लॉकडाऊनमध्ये कोरोनाची शास्त्रीय माहिती मिळवली. आरोग्याचा विषय सर्वांनाच प्राधान्याने घेण्यास सांगितला. बातम्या बघून घाबरून न जाण्याचे , घरात राहून लढणाऱ्याना साथ देण्याचे अवाहन केले. काळजी करू नका पण काळजी घ्या या ब्रीदवाक्याचा अवलंब करण्यास सांगितले . कोरोनाविषयी जनजागृती तर केलीच पण त्याविषयी आढळून आलेल्या अफवा आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.

लॉकडाऊन आणि मनोबल
कोरोनामुळे अनेकजण चिंताग्रस्त झाले आहेत. शारीरिक आरोग्याबरोबरच आपले मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन झूमद्वारे ‘’लॉकडाऊन आणि मनोबल ‘’ याविषयी उद्बोधनपर चर्चा घडवून आणली. त्यांमध्ये सतत एकमेकांना तेच तेच बोलून निराश करण्यापेक्षा आपण इतरांना काय मदत करू शकतो , याचा विचार करुन मदतीचा दृष्टिकोन ठेवण्यास सांगितले. तसेच कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी संयम हवा, हवी असणारी प्रत्येक वेळ येतेच, पण तोपर्यंत धीर धरायला हवा. आज आपण घरी थांबून राहिलो तर उद्या पळता येईलच की. पण आजच पळायला जाल तर उद्या मात्र थांबावे लागेल आणि तो काळ फार अफाट असेल . कोरोना हा 4 दिवसांचा पाहुणा आहे , तो लवकरच निघून जाईल , तेव्हा धीराने घ्या. तुमच्याजवळ असणारे धैर्य , साहस आणि संयमच त्याला पुरते हरवून टाकेल. त्याचबरोबर कोविडच्या निमित्ताने अनेक संधी निर्माण होतील जे या संधीचे सोने करतील ते सर्वार्थाने यशस्वीतेच्या वेगळ्या पातळीवर जावून विराजमान होतील त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न करण्यास सांगितले.

सोशल मिडिया आणि अभिव्यक्ती –
लॉकडाऊन च्या कालावधीत काही व्हिडीओ क्लिप्स सोशल मिडियावरती टाकल्या. त्यावरती बऱ्याच चांगल्या वाईट प्रतिक्रिया आल्या.काही तपशीलात जावून काय आवडले काय नाही अशी चिकित्सा करणाऱ्या होत्या. त्याचबरोबर ताळतंत्र सोडलेल्या प्रतिक्रियांची संख्या आणि तीव्रताही नक्कीच विचारात घेण्यासारखी जाणवली. कोणत्याही विषयावरती आपली मते बनवताना अभ्यास न करणे , थोड्याफार असलेल्या उथळ माहितीलाच अभ्यास मानणे या प्रवृत्ती वाढल्याचे जाणवले. प्रत्येक व्यक्तीचे आकलन हे गुणात्मक दृष्टीने अगदीच वेगळ्या पातळीवरचे असणार , पण पुरेसे आकलन न होताच व्यक्त होण्याची घाई मला यामध्ये दिसून आली . आपल्याजवळ उपलब्ध असणाऱ्या माहितीलाच पोषक पुरावा म्हणून वापरण्याची चतुराईदेखील यावेळी जाणवली .समोरची व्यक्ती चिडत असताना होणारा असुरी आनंदसुद्धा दिसून आला. त्यावेळी माणसं कोणता आणि कसा विचार करतात , यावरती संशोधन सुरु करावे की काय यासारखे विचार मात्र माझ्या डोक्यात घोळत राहिले.

समारोप –
कोरोना येत जात राहील. त्याच्यासह जगण्याची सवय करूनच पुढचे मार्गक्रमण करीत राहवे लागणार आहे. पण या लॉकडाऊनमध्ये मला मात्र जाणवले की निसर्ग चक्रातून उदभवलेल्या अभूतपूर्व अशा जागतिक संकटाचा सामना करण्यासाठीदेखील मानवी समाज पुरेसा शिस्तबद्ध वागू शकत नाही म्हणजेच आपले सुसंस्कृत होणे खूपच बाकी आहे . अशावेळी कोरोनाने आपल्यासमोर आरसा धरला आहे .मानव हा निसर्गाच्या दृष्टीने अडसरच आहे. मात्र, मानवाला निसर्गाची आणि इतर माणसांची नितांत गरज आहे, आणि त्यासाठी आपल्यामध्ये अमूलाग्र बदल केल्याशिवाय आपण शाश्वत विकास घडवू शकणार नाही. अतिरिक्त भीती आणि अवास्तव अपेक्षा यापासून दूर राहणे यातच खरे शहाणपण आहे. इथूनपुढे कोणतीही गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळणार नाही. त्यामुळे वेळ मिळालाच आहे तर स्वतःचे मूल्यमापन करा , स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून जीवन जगणे समृद्ध करा. बाहेरचा नाही पण स्वतःच्या आतील खजिना शोधा तोच उद्याच्या प्रवासात यश देईल.