Dehu News : श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील मंदिर निर्माणाचे कामाने घेतली गती

Dehu News : श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील मंदिर निर्माणाचे कामाने घेतली गती

मंदिराचे निम्मे काम पूर्ण झाले असून या दोन वर्षांत मंदिराचे लोकार्पण होणार


Pckhabar- जगदगुरू, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची चिंतन भूमी असणा-या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या आकाशा एवढ्या कार्याला साजेसे भव्य-दिव्य मंदिर व्हावे, ही सकल वारकरी सांप्रदाय व तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणा-या प्रत्येक भाविकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे.

या मंदिरासाठी स्थापत्यविशारद म्हणून आयोध्यानगरीतील प्रभू श्री रामचंद्रांचे मंदिर ज्यांच्या अलौकिक स्थापत्यकलेतून विराजमान होत आहे ते आदरणीय श्री चंद्रकांत सोमपूरा, श्री.निखील सोमपुरा व बापू मनशंकर सोमपुरा बंधू कार्यरत आहेत. तसेच मंदिराच्या निर्मितीची जबाबदारी श्री रमेशचंद्र सोमपुरा आणि परेशभाई सोमपुरा या पिता पुत्रांनी घेतली आहे. गांधीनगर, गुजरात येथील जगप्रसिद्ध अशा अक्षरधाम मंदिराच्या आधारावर संत तुकाराम महाराजांचे हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे कार्य सुरु आहे. मंदिराची लांबी १७९ फुट, उंची ८७ फुट व रुंदी १९३ फुट असून मंदिराला तीन भव्य कळस असणार आहेत. मंदिराचा घुमट ३४ फुट बाय ३४ फुट असून १३.५ बाय १३.५ फुट आकाराची एकूण ५ गर्भगृहे मंदिरात असणार आहेत. मंदिराच्या मध्यभागी मुख्य जागेवर श्री विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती व या मूर्तीकडे पाहत भक्तीमध्ये दंग झालेली श्री संत तुकाराम महाराजांची मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात येणार आहे.

मंदिराचे बाहेरील खांब हे चौरसाकृती व आतील खांब हे अष्टकोनाकृती असून त्यावर ९०० वैष्णवांच्या प्रतिस्थापना करण्यात येणार आहे. मंदिराचे बाहेरील खांब हे चौरसाकृती व आतील खांब हे अष्टकोनाकृती असून त्यावर ९०० वैष्णवांच्या मूर्तींचे सुंदर असे कोरीव काम असणार आहे. त्याचप्रमाणे विश्ववंदनीय जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संपूर्ण हिंदुस्तानामध्ये रयतेचे राज्य ही लोकशाही पूरक संकल्पना ज्यांनी प्रत्यक्षात प्रथम अमलात आणली ते हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे धारकरी व वारकरी यांच्यासह भव्य – दिव्य शिल्प साकारले जाणार आहे. भंडारा डोंगरावरील हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे पवित्र कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जावे याकरिता वारकरी संप्रदायातील सर्व थोर कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी तसेच तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणारे समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व लहानथोर या मंदिर निर्माणाच्या कार्याला मदत करीत आहेत अशी माहिती भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशीद व मंदिराच्या बांधकामाचे पूर्णपणे नियोजन पाहणारे श्री गजाननबापू शेलार यांनी दिली.

काकडा आरती, अभिषेक, महापूजा व हरिपाठ झाल्यानंतर गाथामूर्ती हभप नानामहाराज तावरे यांच्या सुमधूर वाणीतून गाथा पारायण झाले. सायंकाळी हभप, आचार्य रविदासमहाराज शिरसाट यांनी कैवल्यमूर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर तत्वचिंतन पर निरूपण केले. ज्ञानेश्वरी ग्रंथातील मर्म सामान्य तर सोडाच बुद्धिवंताना देखील कळणे अवघड आहे. ज्ञानेश्वरीची कितीही पारायण झाली तरीही काही काही ओवींचा उलगडा होईलच असे सांगता येत नाही. मराठी भाषेला तत्वज्ञानाचा दर्जेदारपणा ज्ञानेश्वरीच्या रूपाने मिळाला, असे शिरसाट महाराज यांनी निरूपणातून सांगितले. रात्री ८ वाजता भागवताचार्य, हभप डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांची तुकोबारायांच्या अभंगावर कीर्तन सेवा संपन्न झाली.