Pimpri News : लाईट हाऊस उपक्रमाच्या  माध्यमातून युवक- युवतींना रोजगार उपलब्ध : अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील


Pimpri News : लाईट हाऊस उपक्रमाच्या  माध्यमातून युवक- युवतींना रोजगार उपलब्ध : अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील

Pckhabar- समाजविकास विभागाच्या लाईट हाऊस या उपक्रमाच्या  माध्यमातून शहरातील विशेषतः गरीब वस्त्यांमधे राहणाऱ्या युवक- युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी महापालिका नेहमीच कार्यशील असून युवकांना प्रथम  प्रशिक्षण, समुपदेशन व रोजगाराच्या  जास्तीत जास्त  संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लाईट हाऊस फाऊंडेशन च्या वतीने चालविण्यात येणार्‍या रोजगार प्रशिक्षण केंद्रा मार्फत पिंपरी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, रविकिरण घोडके, समाज विकास अधिकारी सुहास बहादरपूरे, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक  यांच्यासह लाईट हाऊसचे पदाधिकारी आणि  विविध कंपन्यांचे संचालक तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, डिजिटेक सोल्यूशन्स, बजाज ऑटो लि., कृष्ण डायग्नोस्टिक्स, चेतक टेक्नॉलॉजीज लि., स्पेरो हेल्थकेअर इनोव्हेशन्स प्रा. लि., स्पेरो हेल्थकेअर इनोव्हेशन्स प्रा. लि., एलएम सी फोर्स प्रायव्हेट लिमिटेड, एसबीआय-क्विस कॉर्पोरेशन, रिलायन्स – एस डी सेवा, चॅनेल प्ले, मार्कोन लॉगी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, यशस्वी ग्रुप, बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, बी एस ए कॉर्पोरेशन, बिग बास्केट, कॅलिबर एचआर, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक यासह विविध कंपन्यांनी सहभाग घेतला. सदर मेळाव्यात लाईट हाऊस मधून कोर्स पूर्ण केलेल्या १५० युवकांनी याचा लाभ घेतला. त्यातील काहींना मेळाव्यात रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करत सहभागी कंपन्यांचे तसेच महानगरपालिकेचे आभार मानले.