Bhosari News : साहित्यिकांनी मराठी भाषेच्या दर्जाशी तडजोड करू नये- सिराज शिकलगार

Bhosari News : साहित्यिकांनी मराठी भाषेच्या दर्जाशी तडजोड करू नये- सिराज शिकलगार यांचे प्रतिपादन

बंधुता दिन व ‘बंधुता काव्य महोत्सव’चे उद्घाटन

Pckhabar- “मराठी भाषा टिकवण्यासाठी साहित्य निर्मितीत शुद्ध लेखन व व्याकरण कटाक्षाने तपासले पाहिजे. अलीकडच्या काळात आभासी माध्यमाच्या वापरामुळे लेखनात याकडे दुर्लक्ष होत आहे. लेखकांनी पुस्तक आणि आभासी माध्यमांवरील लेखन यातील फरक समजून घेत मराठी भाषेच्या दर्जाशी तडजोड करू नये,” असे प्रतिपादन लेखक व कवी सिराज शिकलगार यांनी केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन पुणे, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रितम प्रकाश महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित बंधुता दिन व ‘बंधुता काव्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सिराज शिकलगार बोलत होते. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजिला होता.

प्रसंगी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, बंधुता काव्य महोत्सवाचे अध्यक्ष कवी शंकर आथरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, लेखिका डॉ. माधवी खरात, स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, रजनी पाचंगे, संयोजक प्राचार्य सदाशिव कांबळे, प्रा. अनंत सोनवणे, प्रा. प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनंत सोनवणे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बंधुता प्रबोधन यात्री काव्यसंमेलन रंगले. ‘बंधुता प्रकाशपर्व साहित्य पुरस्कार’ सिल्लोड येथील कवी नारायण खेडकर यांना, ‘बंधुता प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार’ पलूस येथील कवी नामदेव जाधव यांना, तर ‘बंधुता प्रकाशगाथा साहित्य पुरस्कार’ पाथर्डी येथील दिनेश मोडोकर यांना प्रदान करण्यात आले. डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या ‘आई म्हणते’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले.

सिराज शिकलगार म्हणाले, “समाजाला दिशा दाखवण्याचे काम साहित्यिकांनी केले आहे. प्रस्थापित साहित्यिकांनी नवोदितांना प्रोत्साहन द्यावे. बंधुतेची चळवळ विस्तारण्याची गरज आहे. बंधुतेचे तत्व आणि मराठीचा संस्कार रुजण्यासाठी असे महोत्सव उपयुक्त आहेत.”

प्रकाश रोकडे म्हणाले, “माणसे जोडण्याचा, बंधुभाव जोपसण्याचा माझा छंद आहे. बंधुतादिन साजरा होतोय, याचा आनंद आहे. बंधुतेचा विचार आपल्या प्रगतीसाठी महत्वाचा असून, त्यातूनच सामाजिक समानता प्रस्थापित होणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.”

शंकर आथरे म्हणाले, “कसदार, आशयघन काव्यासाठी कवीला निसर्ग आणि माणसांकडे सूक्ष्मपणे पाहावे लागते. संवेदना प्रत्येकाला असतात; पण त्याचे कवितेत रूपांतर करण्यासाठी कवी मातृह्रदयी असावा लागतो. कविता आपले अंतरंग, दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असते.”

डॉ. माधवी खरात, डॉ. अरुण आंधळे, डॉ. अशोक पगारिया, रजनी पाचंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच रोकडे यांचे अभीष्टचिंतन केले.