Lonavala news:  भटक्या कुत्र्यांना मिळाली हक्काची जेवणाची ठिकाणं;  उपक्रम राबवणारे लोणावळा देशातील पहिले शहर

ही बातमी शेअर करा.

Lonavala news:  भटक्या कुत्र्यांना मिळाली हक्काची जेवणाची ठिकाणं;  उपक्रम राबवणारे लोणावळा  देशातील पहिले शहर

Pckhabar- लोणावळा शहरातील रस्त्यावर मोकाट फिरणार्‍या भटक्या कुत्र्यांना सन्मानाने जगता यावे याकरिता प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा झुलका यांच्या संकल्पनेतून लोणावळा शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांसाठी जेवणाची ठिकाणं तयार करत त्याठिकाणी जेवणाची व पिण्याच्या पाण्यांची भांडी बसविण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. जवळपास 25 ठिकाणी ही भांडी बसविण्यात आली असून त्यामध्ये सकाळ व संध्याकाळ दोन वेळा कुत्र्यांसाठी अन्न व पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था केली जात आहे.

लोणावळा नगरपरिषद व सेस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन आज नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सिनेअभिनेत्री आयेशा झुलका व अभिनेते ऋतिक रोशन यांच्या मातोश्री पिंकी रोशन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष आरोही तळेगावकर, मुख्याधिकारी रवि पवार, सिक्युरिटी फाॅम अँनिमल सेफ्टी (सेस इंडिया) या संस्थेचे अध्यक्ष नितेश खरे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, नगरसेविका पुजा गायकवाड, रचना सिनकर, विशाल पाडाळे, भरत हारपुडे, कल्पना आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आयेशा झुलका म्हणाल्या रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे. त्यांना पोटभर अन्न व पाणी मिळाल्यास त्यांची देखील चिडचिड होणार नाही व नाहक कोणावर भुंकणार नाही किंवा कोणाच्या मागे लागणार नाही. या उपक्रमात लोणावळ्यातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी होत हातभार लावावा असे आवाहन केले.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या लोणावळा हे देशातील पहिले शहर आहे ज्यांनी हा नाविण्यपुर्व उपक्रम राबवत रस्त्यांवरील भटक्या प्राण्यांना सन्मान दिला आहे.

लोणावळा शहर हे मागील तीन वर्ष स्वच्छ सर्वेक्षणात नामांकन मिळवत आहे. भटक्या कुत्र्यांना एकाच जागी व चांगले अन्न खाण्यास मिळाल्यास त्यांनी देखील गैरसोय टळेल तसेच कोठेही अस्वच्छता पसरणार नाही. मुख्याधिकारी रवि पवार व नितेश खरे यांनी देखील ह्या उपक्रमाबाबत माहिती दिली. पवार म्हणाले शहरातील शंभर जागा निश्चित करण्यात आल्या असून त्याठिकाणी जेवणाची भांडी ल‍ावण्यात येणार आहे तर खरे म्हणाले लवकरच लोणावळ्यात मुक्या जनावरांसाठी मोफत दवाखाना व समुपदेशन केंद्र सुरू केले जाणार आहे. यामध्ये मुक्या प्राण्यांनी रस्त्यावर वावरताना कसे वागावे याची प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.


ही बातमी शेअर करा.