Pimpri news: शास्तीकर थकबाकी धारकांना देण्यात येणाऱ्या जप्तीच्या नोटिसा थांबवा

ही बातमी शेअर करा.

Pimpri news: शास्तीकर थकबाकी धारकांना देण्यात येणाऱ्या जप्तीच्या नोटिसा थांबवा

पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीची आयुक्तांकडे मागणी

Pckhabar-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मिळकतधारकांना शास्तीकर भरणे कामी जप्तीच्या नोटिसा पाठविण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. आधीच कोरोणामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना आता कुठे संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर येत आहे आणि त्यातच प्रशासनाकडून अशा पद्धतीने नोटिसा पाठवल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.
त्यामुळे शास्तीकर थकबाकी धारकांना दिलेल्या जप्तीच्या नोटिसांचे वाटप तात्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समिती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.

याबाबत पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात
म्हटले आहे की, शास्ती कर थकबाकी शासन स्तरावर फेरविचारासाठी निर्णय प्रलंबित आहे. शासनाकडून निर्णय झालेला नसताना देखील महापालिकेकडून अशाप्रकारे शास्तीकर धारकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत,हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे नोटीस बजावलेल्या धारकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे यातून एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण परिस्थितीचा विचार करून सदर नोटीस वाटपाचे काम थांबविण्यात यावे व वाटप केलेल्या नोटिसा परत घेण्यात याव्यात. असे न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात उपोषण तसेच तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीचे अध्यक्ष व माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर,माजी नगरसेवक विनायक रणसुभे व पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.


ही बातमी शेअर करा.