पिंपरी चिंचवडमध्ये ‘धारावी पॅटर्न’ राबवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात ‘धारावी पॅटर्न’ राबवून कोरोना महामारी आटोक्यात आणावी अशी मागणी भाजपा नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.
यासंदर्भात उत्तम केंदळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. आता पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घ्यावा. धारावी पॅटर्नच्या धर्तीवर पिंपरी चिंचवडमध्येही नागरिकांच्या घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करणे, मोबाईल स्क्रिनिंग करणे, लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करणे, कंटेनमेंट झोनमध्ये पोलिसांच्या मदतीने प्रभावीपणे लॉकडाऊन करणे, क्वारंटाईन सेंटरची अंमलबजावणी करणे, जर इमारतीत कोरोना रुग्ण आढळला तर संपूर्ण इमारत सील करणे आदी उपाययोजना राबविल्या पाहिजेत.
धारावीत तपासण्या, चाचण्या, उपाययोजना नेमके कसे काय केले? अवाढव्य लोकसंख्येच्या परिसरात हे सर्व करताना अडचणी आल्या नाहीत का? या सर्व बाबींचा विचार करून पिंपरी चिंचवड शहरात स्वयंसेवक व प्रशासनाने एकत्र काम केले तर ‘कोरोनामुक्त’ शहराकडे वाटचाल करता येईल. म्हणूनच आयुक्तांनी ‘धारावी पॅटर्न’ची अंमलबजावणी शहरासाठी करावी अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.