Pune news: गव्यानंतर हरणाच्या कळपाचे पुणेकरांना दर्शन

Pune news: गव्यानंतर हरणाच्या कळपाचे पुणेकरांना दर्शन
Pckhabar- पुण्यातील कोथरुड आणि बावधन भागात रानगवा आढळून आल्याची घटना ताजी असताना आता शिवणे परिसरात हरणाचा कळप आढळला आहे. शिवणेत आशीर्वाद सोसायटीत हा हरणाचा कळप आज दिसून आला आहे.

पुण्यातील एनडीए लगतच्या जंगलात विविध प्राण्यांचा वावर आहे. याच जंगलाला लागून शिवणे येथे आशीर्वाद सोसायटी आहे.

सोसायटी व जंगल यांच्यामधील भिंत कोसळल्याने हरणे थेट सोसायटीच्या आवारात प्रवेश करत आहेत. नागरिकही या आगंतुक पाहुण्यांचे स्वागत करताना दिसून येतात. मात्र आजूबाजूला भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात असल्याने हरणांच्या जीवाला धोका असल्याचे या स्थानिक नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, हरणाचा कळप दिसल्यानंतर स्थानिकांनी वनविभागाशी संपर्क साधल्यानंतर वनविभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या भिंतीची तातडीने दुरुस्ती करावी असे पत्र वनविभाग आता एनडीए व्यवस्थापनाला देणार आहे. दरम्यान नागरिक या हरणांना गवत खायला घालत आहेत. आता या हरणांचा फोटो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोथरुड येथे रानगवा घुसला होता. अतिउत्साही नागरिकांनी तोबा गर्दी केली आणि गवा पळत सुटला. यात रानगवा पकडल्यानंतर त्याचा काही तासात मृत्यू देखील झाला. हे प्रकरण ताजे असतानाच बालेवाडीत आणखी एक रानगवा दिसून आला. त्यावेळी तात्काळ वनविभाग व पोलीस दाखल झाले. प्रशासनाने नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे रानगव्याला परत पाठवण्यास वन विभागाला यश आले होते. आता त्यात हरणाचा कळप दिसून आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *