New Corona Virus: यूकेहून येणा-या हवाई प्रवाशांना रहावे लागणार संस्थात्मक विलगीकरणात

New Corona Virus: यूकेहून येणा-या हवाई प्रवाशांना रहावे लागणार संस्थात्मक विलगीकरणात

Pckhabar-यूकेहून पिंपरी-चिंचवड शहरात येणा-या सर्व हवाई प्रवाशांना वाकडमधील जिंजर, सयाजी हॉटेलमध्ये स्व:खर्चाने सात दिवसांसाठी विलगीकरणात रहावे लागणार आहे. नवीन विषाणूच्या पॉझिटीव्ह रुग्णांना भोसरीतील नवीन रुग्णालयात स्वतंत्र ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, हवाई प्रवाशांना शोधण्यासाठी कार्यकारी अभियंता सतिश इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू आढळून आला आहे. त्याचा शहरात प्रसार होवू नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका दक्ष झाली आहे. यूकेहून येणा-या सर्व हवाई प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. प्रवाशांना लक्षणे आढळून आल्यास उपचारासाठी थेट भोसरीतील रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.

प्रवाशी शहरात आल्या-आल्या आरटीपीसीआर चाचणी केली जाणार नसून पाचव्या ते सातव्या दिवसादरम्यान चाचणी केली जाणार आहे. प्रवाशांना स्व:खर्चाने आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी लागेल. चाचणी निगेटीव्ह आढळल्यास प्रवाशाला पाच ते सात दिवसांनी संस्थात्मक विलगीकरण कक्षातून सोडण्यात येईल. या प्रवाशास सात दिवसांचे अनिवार्य होम क्वारंटईन असेल. आरटीपीसीआरचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. परंतु, लक्षणे नसल्यास त्याच हॉटेलमध्ये विलगीकरण करण्यात येईल. त्याचा कालावधी 14 दिवसांपर्यंत असेल. हॉटेलच्या शुल्कानुसार प्रवाशांना शुल्क आकारण्यात येईल.

यूकेहून येणा-या सर्व प्रवाशांची वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएल मार्फत करण्यात येईल. सर्व प्रवाशांचे पासपोर्ट पासपोर्ट जमा केले जातील. विलगीकरण संपल्यानंतर ते परत केले जाणार आहेत. प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी खासगी प्रयोगशाळांमार्फत करण्यात येईल. त्याबाबतचे शुल्क प्रवाशांकडून वसूल केले जाणार आहे. यूकेवरुन येणा-या सर्व प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासाची योजना विचारात न घेता हे नियम लागू राहणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेशात स्पष्ट केले.

नवीन विषाणूच्या पॉझिटीव्ह रुग्णांना जुन्या रुग्णांमध्ये ठेवणार नाही!
कोरोनाचा नवीन विषाणू आहे. त्यामुळे नवीन विषाणूचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास त्याला जुन्या विषाणूच्या रुग्णांमध्ये ठेवण्यात येणार नाही. त्यांना भोसरीतील नवीन रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. भोसरीतील जुन्या कोरोनाच्या 18 रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *