Article By Dr. Ankush jadhav : स्पॅनिश फ्लू-बॉम्बे फिव्हर व कोरोनाची दुसरी लाट?
Pckhabar-जगात अनेक मोठ्या, भयानक महासाथी येऊन गेल्या. त्यापैकी एक स्पॅनिश फ्लू. या महासाथीची सुरवात स्पेनमध्ये जानेवारी 1918 ला झाली व शेवट 1920 मध्ये झाला. जगात 50 कोटी पेक्षा ही अधिक लोक या साथीने बाधित झाले होते. तर 1 कोटी 70 लाख ते 5 कोटी लोकांचा मृत्यू या साथीत झाला. ही साथ यासाठी ही भयानक मानली जाते की, यात सर्वात जास्त मृत्यू कर्तबगार तरुणांचा झाला. तरुणांची एक पिढीच नष्ट झाली. या साथीला कारणीभूत होते. ते एच 1 एन 1 हे विषाणू.
या साथीचा भारतावर, भारताच्या स्वतंत्र चळवळी वरही मोठा परिणाम झाला होता. महात्मा गांधींना ही या साथीची लागण झाली होती. पहिले महायुद्ध 1 ऑगस्ट 1914 सुरू झाले व 11 नोव्हेंबर 1918 मध्ये संपले. मे, जूनपासून युद्ध बंदीची सुरवात झाली होती. 28 मे ला भारतीय सैनिकांना घेऊन निघालेले एक जहाज 10 जून 1918 ला बॉम्बे डॉक यार्डमध्ये पोहचले. ते येथे 48 तास उभे होते. या जागतिक युद्धावरून परतणार्या सैनिकांबरोबरच स्पॅनिश फ्लू चे विषाणू ही भारतात आले. बॉम्बे डॉक यार्डमध्ये ड्युटी वर असणार्या 7 पोलिसांना याची बाधा झाली. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. तर ज्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. त्या सैनिकाद्वारे या साथीचा प्रसार भारतात झाला. म्हणून या साथीस बॉम्बे फिव्हर असेही म्हणतात. यावेळी मुले व वृद्ध हे मोठ्या प्रमाणात संक्रमित झाले होते. यावेळी मृत्यदर ही कमी होता. जून, जुलै मध्ये सुरू झालेल्या या साथीवर नियंत्रण करण्यात यश आले होते. सामान्यतः कोरोनात आज जी बंधने पाळली जात आहेत. तीच बंधने त्या वेळी काटेकोर पणे पाळली गेली. म्हणून साथ लवकर नियंत्रणात आली. परंतु सप्टेंबरमध्ये आलेली मुंबई फिव्हरची दुसरी साथ भयानक होती. या दुसर्या लाटेत 20 ते 40 वर्षे या वयोगटातील तरुण स्त्री व पुरुषांचा संख्या अधिक होती. यात मोठया प्रमाणात प्राणहानी झाली. या लाटेत भारतात 1 कोटी 33 लाख पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. भारताची 5 टक्के लोकसंख्या कमी झाली. भारतात या साथीचा मृत्यु दर 1. 2 टक्के असला तरी जगात तो 10 ते 20 टक्के होता. लोकसंख्या वाढीचा दर ही यावेळी कमी झाला होता.
जून, जुलैमध्ये आलेल्या साथीवर नियंत्रण मिळविल्यामुळे लोक बिनधास्त झाले. बिनदास्त राहण्यास सुरवात केली, नियंत्रणे पाळणे बंद केले. परिणामी दुसरी लाट आली व प्राणहानी सहित सर्व प्रकारचे प्रचंड नुकसान झाले. ही आठवण या साठीच आहे की, कोरोना कमी झाला म्हणून लोक बिनदास्त राहू लागले आहेत. मास्क नाकातोंडावर न घालता शोभेसाठी गळ्यात अडकवत आहेत. तर बरेच लोक मास्क वापरतच नाहीत. लोक आता गर्दी पूर्वीपेक्षा ही जास्त करू लागले आहेत. थंडीतील वातावरण विषाणू व संक्रमणासाठी पोषक असते. म्हणून थंडीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेसहित अनेक संस्थांनी सांगितले आहे.
म्हणूनच स्पॅनिश फ्लू, बॉम्बे फिव्हर मधून आपणास काही गोष्टी शिकणे अत्यंत आवश्यक आहे. कारण बरेच वेळा इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. फ्रान्स सारख्या देशांनी पुन्हा लॉकडाउन सुरू केले आहे. याच वर्षी त्या ही साथीला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. कोरोनामुळे जगात दहा लाख लोकसंख्येमागे 152, ब्राझीलमध्ये 748, अमेरिकेत 686, ब्रिटन 681, फ्रान्स 555, रशिया 191 तर भारतात 88 लोकांचा मृत्यु झाला आहे. जगाच्या मानाने भारतात कोरोनाच्या या लाटेने फारसी प्राणहानी व अन्य नुकसान झाले नसले, तरी कोरोनासारख्या महासाथीची काळजी घेणे, त्याविषयी सावधानता बाळगणे केंव्हाही चांगले. फार बिनधास्त राहू नका. घाबरू नका पण काळजी घ्या. योग्य ती काळजी घेऊनच दुसरी लाट आली तरी त्या लाटेला परतून लावता येईल.
डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली)
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply