Pimpri news: पालिकेत प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार झाले फुल कारभारी!

Pimpri news: पालिकेत प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार झाले फुल कारभारी!

आयुक्त मेहरबान

Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रभारी आणि वादग्रस्त कार्यशैली असलेले अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार पालिकेचे फुल कारभारी झाले आहेत. त्यांची कार्यशैली वादग्रस्त असतानाही आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांच्यावर मेहरबान झाले आहेत. अगोदरच निविदा काढला जाणार मध्यवर्ती भांडार विभाग, आरोग्य असे मलईदार विभाग असताना आता कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या जात असताना महत्वाचा पाणीपुरवठा विभाग, बांधकाम नियंत्रण विभाग पवारांकडे सोपविला आहे. अशा 14 विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली आहे. त्यामुळे पालिका कारभार प्रभारीच्या हाती गेला असून प्रभारी फुल कारभारी झाले आहेत. प्रभारी आणि वादग्रस्त असलेल्या पवार यांच्यावर आयुक्त मेहरबान झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश करण्यात आल्याने तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यात दोन राज्य सेवेतील आणि एक पालिका सेवेतील आहेत. राज्य सेवेतील संतोष पाटील एक नंबरचे अतिरिक्त आयुक्त आहेत. तर, पुणे विभागीय जात पडताळणी समितीची जबाबदारी असलेले अजित पवार यांच्याकडे 26 जुलै 2019 रोजी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा ‘अतिरिक्त पदभार’ देण्यात आला आहे. वर्षभरापासून त्यांच्याकडे पालिकेत अतिरिक्त जबाबदारी आहे. त्यांची मूळ आस्थापना जात पडताळणी विभागात आहे. त्यांचे वेतनही राज्य सरकारमार्फत होते.

अजित पवार यांच्याकडे ‘अतिरिक्त’ जबाबदारी असतानाही त्यांच्याकडे पालिकेतील महत्वाचे विभाग दिले आहेत. त्यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभाग, आरोग्य असे मलईदार विभाग होते. आता कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या जात असताना महत्वाचा पाणीपुरवठा व जल:निस्सारण विभाग, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, पर्यावरण अभियांत्रिकी असे महत्वाचे विभाग दिले आहेत. वादग्रस्त कार्यपद्धती, कार्यशैली असलेल्या अधिकाऱ्याकडे आयुक्तांनी महत्वाचे विभाग दिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

अतिरिक्त जबाबदारी असतानाही पवार यांच्या ताब्यात निम्मी पालिका दिली आहे. पवार यांची कार्यपद्धती वादग्रस्त राहिली आहे. शिक्षण विभागाच्या अतिरिक्त पदभरात त्यांनी न्यायालयात प्रलंबित असलेल्या फाईलवर रात्री दहा वाजता स्वाक्षरी केली होती. त्यावर नगरसेवकांनी महासभेत आवाज देखील उठविला होता. कोरोना काळात काही नगरसेवकांना हाताशी धरून त्यांनी अतिरेक केला असल्याचे अधिकारी खासगीत तक्रारी करत आहेत. नगरसेवकांना सांभाळतात, ठेकेदारांचा मोठा राबता त्यांच्या दालनात असतो, अशी पालिका प्रशासनात जोरदार चर्चा आहे. आपली ‘आयएएस’ म्हणून बढती होणार असून आपणच पालिकेचे पुढील आयुक्त होणार असल्याचे पवार सर्वांना खासगीत सांगतात. तशी ते फिल्डिंग लावत असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण, तसे होण्याची सुतराम शक्यता नसल्याचेही सूत्र सांगते. आता तर महत्वाच्या विभागासह निम्मी पालिका हाती आली आहेत. त्यामुळे त्यांच्या आनंदला उधाण आले असून ऐन दिवाळीत पालिकेत शिमग्याचे वातावरण आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर अतिरिक्त पदभार असलेल्या अजित पवार यांच्यावर एवढे मेहरबान का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अतिरिक्त पदभार असलेल्या अधिकाऱ्याकडे महत्वाचे विभाग देण्याची घटना पालिका इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे.

पालिकेत अतिरिक्त जबाबदारी असलेल्या अजित पवार यांच्याकडील ‘हे’ आहेत महत्वाचे विभाग!

पाणीपुरवठा व जल:निस्सारण विभाग, बांधकाम परवानगी,अतिक्रमण मुख्य कार्यालय (अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभाग), पर्यावरण अभियांत्रिकी, मध्यवर्ती भांडार विभाग, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय, कर आकारणी व करसंकलन विभाग, आकाशचिन्ह व परवाना विभाग, स्थानिक संस्था कर, भूमी आणि जिंदगी, सर्व क्षेत्रीय कार्यालये, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय, प्रेक्षागृहासह), निवडणूक जनगणना (आधारसह), सभाशाखा असे महत्वाचे 14 विभाग त्यांच्याकडे दिले आहेत.