Article By Dr. Amit Nemane : आपला चार्जिंग पॉईंट !

Article By Dr. Amit Nemane : आपला चार्जिंग पॉईंट !

– डाॅ नेमाणे अमित
Pckhabar-वाचक मित्रांनो ,आज आपण स्वतः ला प्रोत्साहित ठेवण्याबद्दल बोलूयात ! प्रत्येकाची काही स्वप्ने असतात, प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी मिळवायचं असतं , तर काही बनायचं असतं. हेच ते काहीतरी मिळवायचं ज्या वयात आपण ठरवतो, तेव्हा आपाल्यामध्ये असलेला मानसिक ,शारीरिक ऊर्जा स्त्रोत देखील अथांग, अफाट असतो. मात्र जसजसे दिवस जातात, महिने जातात, वर्ष उलटून जातात, तेव्हा ती ऊर्जा कमी होते आणि आपल्या आयुष्यात जे हवे होते, जे करायचे होते ती गोष्ट मागे पडते , एक वेगळेच येवून ठेपलेले आयुष्य आपण जगत रहातो. असे काहीसे आपल्याला बरोबर झाले आहे का ?? किंवा आपल्याबरोबर होते का ? ८५ टक्के लोकांचे उत्तर होय असेच असेल !! कारण हाच ८५ टक्के समाज आहे , जो नियमित आपल्या नजरेस पडतो. अचानक आठवलं म्हणून नमूद करतो, परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्याय चळवळीचे प्रसारक आणि भगवद्गीतेचे गाढे अभ्यासक होते , ते असं म्हणतात की समाजामध्ये ८५ टक्के लोक हे अनुकरण करणारे म्हणजेच फॉलॉवर असतात आणि उरलेल्या टक्क्यांमध्ये १५ टक्के यशस्वी ,प्रगतिशील ,प्रामाणिक ,तत्ववाद, विचारी लोक असतात , तर उरलेले १५% नाठाळ प्रवृत्ती दुर्विचारी स्वरूपाचे असतात . आता गंमत अशी आहे की , ८५% अनुकरण करणारा जो समाज असतो , त्यांनी या लबाड ,नाठाळांचे अनुकरण केले की ८५ + १५ = १०० टक्के समाज नाठाळ होते आणि त्याच ८५ % लोकांनी प्रामाणिक ,विचारी लोकांचे अनुकरण केले तर १०० टक्के समाज विचारी , संयमी बनतो .त्यामुळे आपण केवळ विद्वत्तेने जगणे महत्वाचे नसून , आपले सुविचार इतरांना देणे हे देखील तेवढेच गरजेचे असते , तरच समाज विचारी बनतो आणि इतिहासात त्याची नोंद घेतो . असो ! आपल्या विषयाकडे वळूयात…

जी गोष्ट आपल्याला हवी आहे , जे आपल्याला करायचे आहे , जे आयुष्यात बनवायचे होते , ते मागे सुटले आहे का ?? किंवा आपण आयुष्यात दुसरेच काही करतो आहोत का ?? ” जे आवडते ते केले पाहिजे आणि जे करतोय ते आवडले पाहिजे, तरच आयुष्यात यशस्वी झाल्याचा विश्वास आपणास प्राप्त होईल ! ” मात्र समाजातील अनेक घटकांशी चर्चा केल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आयुष्यात जे साध्य करायचे होते ते विसरले, आणि जे साध्य ती मंडळी करीत आहेत त्यात त्यांना विशेष रूची नाही, याचा अर्थ मानवीय उत्पादनक्षमता घेण्यात होतो. युवा वर्गातील ऊर्जा वाया जाते , ती देखील याच कारणामुळे आणि भौतिक विज्ञान आपल्याला शिकविते ही ऊर्जा कधीही लोप पावत नाही , केवळ एका रूपातून दुसऱ्या स्वरूपात ऊर्जा वाहते आणि हीच योग्य न वापरली गेलेली ऊर्जा समाजविघातक कृत्यां मधून बाहेर पडते , म्हणून मित्रांनो ऊर्जेचा योग्य वापर करणे नितांत गरजेचे असते.

आपलिया आयुष्यात जे आपल्याला साध्य करायचे आहे त्यात यशस्वी न होण्याची कारणे बघूयात ; साधारणतः एखादे उदाहरण घेऊ समजा एखाद्या विद्यार्थ्याला अगदी कळत्या वयापासून डॉक्टर , वकिल , अभियंता बनण्याची इच्छा आहे. मात्र पुढे जाऊन तो डॉक्टर वकिल किंवा अभियंता व्यतिरिक्त ईतर काही ( माझा हेतू कुठल्याही कामाला नावे ठेवण्याचा हेतू नाही) काम करू लागला , तर असे का झाले असेल ?? कदाचित केवळ स्वप्न पाहणे आणि त्याची मजा अनुभवली मात्र प्रत्यक्षात यासाठी कोणताही योग्य जोडीदार, मित्र, सवंगडी न निवडणे , आवडत्या क्षेत्राविषयी कोणतीही माहिती न मिळविणे, आवडत्या क्षेत्रातील तज्ञांनी न भेटणे, डॉक्टर किंवा इतर काही तज्ञ बनण्यासाठी लागणारी मेहनत न करणे , केवळ रात्रीचे स्वप्न बघितल्याप्रमाणे ते बघणे , जे हवे त्यासाठी प्रयत्न न करणे , अशी अनेक कारणे असू शकतील.

दुसरे उदाहरण बघुया , एखाद्या विद्यार्थी आयएएस /आयपीएस होण्याचे स्वप्न बघतो , आपण अगदी चार-पाच वेळा परीक्षा देऊ शकतो , असे काहीसे त्याच्या लक्षात येते आणि तो सर्व प्रयत्नात आपण एकदा तरी परीक्षा उत्तीर्ण होऊ अशी आशा करतो, मात्र अगदी जोमाने सुरुवात केलेली गोष्ट पुढे जाऊन त्यातला रस कमी होणे किंवा सतत स्वतःला चार्जिंग न करणे या पातळीपर्यंत पोहचते , साधारणतः पाचशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत अगदी जोमाने सुरू केलेला धावपट्टु , हा २०० मीटर पहिल्या क्रमांकावर पळाल्यानंतर , मध्येच धावन्याची स्पर्धा सोडून स्विमिंग (जलतरण )स्पर्धेत जाऊन पोहोचतो , असे काहीसे चित्र धावपट्टी स्वरूप आयुष्याचे होते.

कधी अज्ञात ठिकाणी शांत बसून विचारांची तार लागल्या नंतर कळते , की आपल्या आयुष्यात करायचे काय होते आणि आपण करीत काय आहोत ? मध्यंतरी मला एक सद्गृहस्थ भेटले , त्यांचा एक जगावेगळा छंद होता तो म्हणजे , मंत्री ,आयएएस /आयपीएस अधिकारी ,मोठे डॉक्टर ,वकील ,कंपन्यांचे मालक ,मोठमोठे कलाकार यांना भेटण्याचा , यांच्याशी किमान दोन वाक्यांचा संवाद साधण्याचा . ते यासाठी प्रचंड उहापोह करतात आणि ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात . या अनोख्या छंदाचे वर्णन अनेक वर्तमानपत्रात देखिल आले आहे , असे त्यांनी मला पुराव्यानिशी दाखविले . मला न राहून मी त्यांना एक प्रश्न विचारला की , आपण या सर्व यशस्वी लोकांची भेटण्यात काय एवढी धन्यता मानतात ?? , तर त्यांनी त्याचे फार सुंदर उत्तर दिले ते म्हणाले की , ” सर माझे वय 60 वर्षे आहे ! परंतु मला स्वतःला स्व कर्तृत्ववान मोठ्या पदावर गेलेले लोक फार आवडतात ! मी जेव्हा अशा लोकांना भेटतो , तेव्हा माझी उर्जा , शक्ती द्विगुणित होते , त्यांची एनर्जी मला ट्रान्सफर होते आणि आयुष्यात जगताना एक नवीन खुमारी तयार होते !! ” या उत्तराने मला
” चार्जिंग पॉइंट ” ची कल्पना सुचली ! आयुष्य प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा मिळविण्यासाठी चार्जिंग पॉईंट लागतो. जी व्यक्ती स्वतःला नियमित सकारात्मक चार्ज करते , ती कायमस्वरूपी यशाच्या दिशेने प्रवास करते. आता हा चार्जिंग पॉईंट काय असतो ? तर तो म्हणजे एखादे सुंदर व्याख्यान ,एखादा सुंदर व्हिडिओ ,एखादा चांगला चित्रपट, एखादे चांगले पुस्तक ,एखादा चांगला मित्र …किंवा काही जेथून सकारात्मक ऊर्जा मिळते , तेथून सतत ही ऊर्जा मिळविने गरजेचे असते , तरच आपण आयुष्यात काहीही प्राप्त करू शकतो . ती व्यक्ती धेय्य वेडी आहे , असे आपण काही यशस्वी लोकांबद्दल ऐकत असतो , याचा अर्थ ती व्यक्ती सतत सकारात्मक ऊर्जा असणारी असते , म्हणून ती विशिष्ट सकारात्मक धेय्याचा पाठलाग करीत असते .
वाचक मित्रांनो , वरील लेखातून मला एवढेच नमूद करायचे आहे की , प्रत्येकाने स्वतःला सकारात्मकतेने प्रोत्साहित केले पाहिजे. तरच आपण आयुष्य कोणतीही गोष्ट यशस्वीपणे प्राप्त करू शकतो. स्वतः प्रोत्साहित असणे आणि इतरांना सकारात्मक उर्जा देणे ही काळाची गरज आहे , हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला शिका आणि वाचणार्‍या प्रत्येकाने आपण स्वतःला सकारात्मक प्रोत्साहन कसे देतो ? , याचा विचार केला पाहिजे !! तुम्ही स्वतःला सकारात्मक कसे ठेवता? काय आहे तुमचा चार्जिंग पॉइंट ?? लिहीते व्हा !!

– डाॅ नेमाणे अमित
( व्याख्याते आणि दंतरोग तज्ञ )

 

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *