Article : ‘महात्म्य नवदुर्गांचे’ : नवरात्रोत्सवानिमित्त प्रा. पाटील माधुरी यांचा विशेष लेख
प्रा.पाटील माधुरी सचिन
जिजामाता ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा
Pckhabar- दरवर्षी ज्या उत्साहात आपण सण साजरे करत होतो, त्याप्रमाणे यावर्षी झाले नाही. कारण आपल्यासमोर कोरोनाचे महाकाय संकट आ वासून उभे राहिले आहे पण तरीही आपल्या परंपरेने सर्व सण साजरे होताहेतच. गणपती, गौरी याच्या पाठोपाठ येतो. तो नवरात्रोत्सव त्याची लगबग आता प्रत्येक कुटुंबात सुरूच आहे. देवी दुर्गा हे सकारात्म ऊर्जेचे शुद्ध रूप म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये दुर्गेचा अर्थ अजेय असा आहे. एकीकडे ती उर्जास्थान आहे तर दुसरीकडे ती सर्व गोष्टींचा नाश करणारी आहे. दुर्गा ही देवता भगवान शिवाची पत्नी पार्वती देवीचा अवतार आहे. हिंदू घरात पार्वती देवीची पूजा केली जाते. असे म्हणतात
शरदात रंगतसे उत्सव हा नवरात्रीचा,
ओसंडून वाहूदे आपल्या जगतात
महापूर नाविन्याचा अन आनंदाचा…
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते. या नवरात्रात देवीपुढे अखंड दीप लावला जातो आणि रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची छान छान भजने, स्रोतही म्हटली जातात परंतु या नऊ दिवसात देवीची विविध रूपे असतात ती नेमकी कोणती त्याची आराधना कशी असते हे आज मी आपल्यासमोर उलगडणार आहे.
नवरात्रीचा पहिला दिवस
आई दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते. पर्वतराजा हिमालय याच्या घरी मुलीच्या रूपाने जन्म झाल्यामुळे तिचे नाव शैलीपुत्री ठेवण्यात आले. आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे तिने विष्णुशी लग्न न करता शंकराला वरले. म्हणून शैलपुत्री दुर्गा ही दृढनिश्चयी आणि कठोर तपाची शिकवण देते .
#नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. म्हणून तिला प्रथम दुर्गा म्हटले जाते. डाव्या हातात त्रिशूळ आणि उजव्या हातात कमळाचे फुल असते.
नवरात्रीचा दुसरा दिवस
देवी दुर्गेचे दुसरे रूप ब्राह्मचारिणी या नावाने ओळखले जाते. ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरण. म्हणजेच तपाचे आचरण करणारी देवी. देवीचे हे रूप खूपच शांत, सौम्य आणि सुंदर आहे. ब्राह्मचारिणी देवी पांढऱ्या शुभ्र वस्त्रात असते तिच्या उजव्या हातात कमंडलू असतो पौराणिक ग्रंथात असे नमूद केले आहे की देवी हिमालयाची मुलगी होती नंतर नारदाच्या उपदेशानुसार देवाला पती मानण्यासाठी तिने खूप कठोर तपश्चर्या केली त्यामुळे तिचे नाव ब्राह्मचारिणी पडले.
नवरात्रीचा तिसरा दिवस
देवी दुर्गेचे तिसरे रूप चंद्रघंटा या नावाने ओळखली जाते. सिंहावर आरूढ झालेल्या या देवीचा चेहरा पाहून अत्याचारी दैत्य, दानव आणि राक्षस हे भीतीने कापले जातात. कल्याण करणारे व शांतीदायक दशभुजा स्वरूप. देवीच्या माथ्यावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे. त्यामुळे तिला चंद्रघंटा म्हटले जाते. सर्व हातात अस्त्रे आहेत. पूजनाने सर्व कष्टना मुक्ती मिळते असे म्हणतात म्हणून तिसऱ्या दिवशी तिचे पूजन करतात.
नवरात्रीचा चौथा दिवस
देवीचे चौथे रूप म्हणजे कुष्मांडा या नावाने ओळखले जाते. या कुष्मांडा देवीलाच सृष्टीची आदिशक्ती म्हटले जाते. कुष्मांडा म्हणजे कोहळा हिला कोहळ्याचा बळी दिला जातो. देवीचे हे रूप खूपच, शांत, सौम्य आणि सुंदर आहे. या देवीला आठ भुजा असल्यामुळे तिला अष्टभुजा देवी म्हणतात त्याच बरोबर तिच्या सात हातामध्ये क्रमशः कमंडल, धनुष्य, बाण, कमळफुल, अमृतपूर्ण कलश, आणि गदा आहेत आणि आठव्या हातात सिध्दी आणि जपमाळ आहेत आणि ही देवी सिहांवर विराजमान आहे.
नवरात्रीचा पाचवा दिवस
देवीचे पाचवे रूप स्कंदमाता या नावाने ओळखले जाते. सर्व देवीच्या रुपासारखेच या देवीचे रूपही मोहक आणि सुंदर आहे कमळासनावर विराजमान आहे .या देवीचा वर्ण पूर्ण शुभ्र आहे. ही देवी आपल्या भक्तांना संकटांपासून मुक्ती देते. कोणी कितीही पापी असला तरी तो देवीच्या चरणी गेला तर देवी त्याला त्याच्या पापापासून मुक्ती देते.
नवरात्रीचा सहावा दिवस
देवीचे सहावे रूप कात्यायनी नावाने ओळखले जाते. कत नावाच्या ऋषींच्या कुलात, कात्यक गोत्रात उत्पन्न झालेली अशी ती कात्यायनी. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या या रूपाची पूजा करतात.
नवरात्रीचा सातवा दिवस
देवी दुर्गेचे सातवे रूप कालरात्री या नावाने ओळखले जाते.काळे शरीर असलेली, तीन डोळे असलेली, केशसंभार विखुरलेला, वाहन गदर्भ, खडग धारण केलेली, भयानक असे रूप. नवरात्राच्या सातव्या दिवशी हिचे पूजन करतात.
नवरात्रीचा आठवा दिवस
देवी दुर्गेचे आठवे रूप म्हणजे महागौरी. गोरा वर्ण, आभूषणे व वस्त्र पांढऱ्या रंगांची, चार हात असलेली व वृषभ हे वाहन असलेली. नवरात्रीच्या आठव्या दिवशी हिचे पूजन करतात.
नवरात्रीचा नववा दिवस
देवीचे नववे रूप म्हणजे सिद्धीदात्री. सर्व सिध्दी देणारी. हिच्या उपासनेने आठ सिध्दी प्राप्त होतात व पारलौकिक कामना पूर्ण होतात अशी समजूत आहे नवरात्रीच्या नवव्या दिवशी हिचे पूजन करतात.
भक्तांच्या रक्षणासाठी मारक रूपे घेऊन अवतरणाऱ्या आणि राक्षसरुपी दुर्जनांचा सर्वनाश करणाऱ्या श्री दुर्गादेवी विषयीची माहिती आपण पाहिली.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Arjun
छान माहिती