Crime news : चाकण रोडवर 20 कोटींचे ड्रग्ज जप्त; पाच जणांना अटक
Pckhabar- मुंबईच्या दिशेने मोटारीने ड्रग्ज घेऊन जाणार्या पाच जणांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 20 कोटींचे ड्रग्ज, 5 लाख रुपयांची कार आणि 23 हजार 100 रुपये रोख रक्कम आरोपींकडून हस्तगत केली. ही कारवाई चाकण-शिक्रापूर रोडवर शेल पिंपळगाव येथे केली.
चेतन फक्कड दंडवते (वय 28, रा. मलठण-आंब्रेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय 25, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (वय 25, रा. पाचर्णे मळा, ता. शिरुर), संजिवकुमार बन्सी राऊत (वय 44, रा.झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय 31, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पथक प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांना माहिती मिळाली की, चाकण शिक्रापूर रोडने निळ्या रंगाची फॉक्सवेगन पोलो कार (एम एच 12, एम एल 4716) जात आहे. तिच्यामध्ये अंमली पदार्थ आहेत. या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी चाकण-शिक्रापूर रोडवर शेल पिंपळगाव, मोहीतेवाडी, धावरदरा परिसरात सापळा लावला. पोलिसांनी आरोपीच्या कारचा पाठलाग करून एका हॉटेलसमोर तिला गाठले. चेतनकडे असलेल्या पिशवीत आणि अक्षय, संजीवकुमार, तौसीफ यांच्याकडे असलेल्या ट्रॅव्हलींग बॅगमध्ये तब्बल 20 किलो मेफेड्रॉन (एम डी) ड्रग्ज आढळून आले. या ड्रग्जची किंमत 20 कोटी रुपये एवढी आहे. पोलिसांनी 20 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एम डी) ड्रग्ज, 5 लाख रुपयांची कार आणि 23 हजार 100 रुपये रोख रक्कम आरोपींकडून हस्तगत केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, सहाय्यक पोलीस फौजदार शाकीर जिनेडी आदींच्या पथकाने केली.
दरम्यान, शहर परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्याची ही पहिली कारवाई आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे या कारवाईसाठी कौतुक केले आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन नुकतेच उघडकीस आले आहे. या ड्रग्जची विक्री कुठे आणि कुणाला करणार होते, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.










Leave a Reply