Chakan news : चाकणमधील दरोडा प्रकरणात पोलिसाचा सहभाग

Chakan news : चाकणमधील दरोडा प्रकरणात फौजदाराचा सहभाग

गुन्ह्याची कुणकुण लागताच झाला पसार
Pckhabar- दोन आठवड्यापूर्वी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाटा कंपनीचे २७ लाखाचे स्पेअर पार्ट घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला चाकूचा धाक दाखवून कंटेनर पळवून नेल्याप्रकरणी चाकण पोलीसांनी तीन जणांना गजाआड केले. या लुटमारीत चाकण पोलीस ठाण्यातील एका फौजदाराचाही सहभाग असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच फौजदार पसार झाला आहे. चाकण पोलीसांनी सुरूवातीला जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रम पासलकर असे पसार झालेल्या फौजदाराचे नाव आहे. सध्या पासलकर चाकण पोलीस ठाण्याअंतर्गत म्हाळूंगे पोलीस चौकीत कार्यरत आहे. विनोद ठाकरे (वय २८, रा. मेदनकरवाडी, चाकण), जितेंद्र रामभवन त्रिवाद (वय ३०, रा.चाकण) आणि रियाज अमिन इमानदार (वय २४, रा. ठाकुर पिंपरी,
ता. खेड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. इतर आरोपींचा शोध सुरू
असल्याचे चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी
सांगितले. याप्रकरणी २१ सप्टेंबर रोजी अंकुश लक्ष्मण केंद्रे (वय ४०, रा.
शिरसाठवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद
दिली आहे. फिर्यादी केंद्रे हे त्यांच्या कंटेनरमध्ये टाटा कंपनीच्या
वेअर हाऊस मधील स्पेअर पार्टचा माल भरून दुसऱ्या एका कंपनीत रिकामा
करण्यासाठी जात होते. ठाकूर पिंपरी रस्त्यावर दोन दुचाकीवरून आलेल्या
चार चोरट्यांनी त्यांची दुचाकी कंटेनरला आडवी घातली आणि कंटेनर थांबवला.
आरोपींनी केंद्रे यांना चाकूचा धाक दाखवून डोळ्याला रुमाल बांधला.
चोरट्यांनी कंटेनर चालवत नेऊन रोहकल गावाजवळ त्यातील २७ लाख रुपयांचा
स्पेअर पार्टचा माल जबरदस्तीने काढून घेतला. तसेच केंद्रे यांच्याकडील
दीड हजारांची रोकड चोरून नेली. या प्रकरणाचा तपास करताना पोलीसांनी तीन जणांना अटक केली. या आरोपींकडून चाकण ठाण्यातील फौजदार विक्रम पसलकर यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. मात्र,
आपले नाव समोर आल्याची कुणकुण लागताच आरोपी पासलकर हे पसार झाले. चाकण पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *