
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
प्रा. माधुरी सचिन पाटील
जिजामाता ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा
Pckhabar-आज 150 वर्षे झाली तरी ज्या महामानवाची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो ते म्हणजे महात्मा गांधीजी त्यांच्या विषयी चार शब्द… महात्मा गांधीजी म्हटले की फक्त सत्य, अहिंसा, सत्याग्रह ,स्वछता या गोष्टीवरच जोर ! पण खऱ्या अर्थाने आज उलगडतोय या शब्दांचा अर्थ.. आजही फळ्यावर सुंदर हस्ताक्षरात एक सुविचार लिहलेला दिसतो, नेहमी खरे बोलावे यातील खरे म्हणजे सत्य हे आज मला समजतंय. गांधीजी नेहमी सत्य या तत्वावरच टिकून राहिले अगदी अखेरच्या श्वासापर्यंत.
गांधीजी प्रसिद्धीच्या शिखरावर असताना या व्यक्तीला आपण केलेली चोरी, वासना, आदी गोष्टीवर जाहीर वाच्यता करताना जराही संकोच वाटलेला दिसत नाही ते म्हणतात मी पहिली चोरी केली तेव्हा खूप रडलो, आता काय करावे हे कळेना शेवटी मी ठरवले की वडिलांना सत्य सांगायचे असे ठरवून वडिलांना सत्य सांगणारे गांधीजी मला त्यांच्या सत्याचे प्रयोग या पुस्तकातच वाचायला मिळाले पण आज परिस्थिती अगदी उलट जाणवतेय सत्य बोलणं किंवा खरे बोलणे या गोष्टी स्वार्थासाठी कुठेतरी बाजूला पडलेल्या दिसताहेत. सत्य म्हणजे काय ? कसे ओळखायचे ? प्रत्येकाचे सत्य वेगळं आणि इथे प्रत्येकाला असे वाटते की माझेच बरोबर यातून आपला जो गोंधळ उठतो त्यातून बाहेर कसे पडायचं यावरही जरा प्रकाश टाकणे गरजेचे आहे. मला तर वाटते सत्य बोलण्यापेक्षा एकमेकांच्या सत्यामधला वेगळेपणा जाणून घेणं आणि त्याला माण देणं हेच यामितील महत्वाचे आहे म्हणजेच इथे नकळत सत्याला अहिंसा जोडली जाईल.
गांधीजींनी अहिंसेचा पुरस्कार केला आणि तसे आपल्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनात आचरण केले. अहिंसेचा पुरस्कार करून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि अहिंसेच्या तत्वज्ञानातच जनकल्याण व जगकल्याण आहे हे दाखवून दिले. अहिंसा म्हणजे अथांग प्रेम, कष्ट सोसण्याची अपार शक्ती म्हणून आई ही अहिंसेची आदर्श मूर्ती असे गांधीजी मानत असत. क्षमेला मानवी जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे. माणूस चुकणार, चुकत शिकणार, आणि सुधारत जाणार या विचारावर क्षमतेचे तत्वज्ञान अवलंबून आहे. चुकणे हा माणसाचा गुणधर्म असेल तर क्षमा करणे हाही माणसाचाच गुणधर्म असेल तर क्षमा ही अहिंसेची प्रभावी साधने आहेत. क्षमावृत्तीमुळे माणसाला स्वतःचा राग आवरता येतो तर द्वेष वृत्तीवर मात करता येते. जो क्षमा करतो तो चूक करणाऱ्यापेक्षा उदार, उदात्त व महान ठरतो पण तसे ठरवण्यासाठी क्षमा करायची नसते. क्षमाशील माणसात दुसऱ्या बद्दल प्रेम, दया, असते दुसऱ्याच्या भल्याचा विचार असतो. दुसऱ्यात परिवर्तन घडवून आणण्याची इच्छा असते हेच मला गांधीवादी तत्वज्ञानातून उमगले.
सत्य, अहिंसा, सत्याग्रह याबरोबर गांधीजी स्वच्छतेचे पुजारी होते. स्वच्छता ही आतून व बाहेरून असेल तरच ईश्वराप्रत पोहचते अशी गांधीजींची धारणा होती, असाच एक स्वचतेचा प्रसंग मनावर प्रकाश टाकून जातो. त्याकाळी काही स्वछतेची कामं समाजातील ठराविक लोकांनीच करावी असा समज भारतीयांनी करून घेतला होता. त्यातीलच एक काम म्हणजे संडासाची सफाई .साबरमती आश्रमात सुरुवातीच्या काळात संडासची सफाई करण्यासाठी एका मुलाची नेमणूक केलेली होती. परंतु एक दिवस तो मुलगा कामावर आला न्हवता, हे काम कोणी करावं हा प्रश्न आश्रमवासीयांवर पडला. त्यावेळी ते काम गांधीजींनी केले आणि आंघोळ करून सर्वांच्या अगोदर प्रार्थनेसाठी येऊन बसले. पुढे आश्रमात सर्वजण ही काम स्वेच्छेने करू लागली. गांधीजींच्या विचारांचा प्रभाव लोकांवर इतका पडला की त्यांच्या निधनानंतर अनेकजनांनी आयुष्यभरासाठी गोड खाण सोडलं, गादीवर झोपणं सोडलं, आज किती नेत्यांच्या बाबतीत हे घडेल?इतकी भक्ती आज जडत नाही. याचं कारण आपण असंवेदनशील होत चाललोय एव्हढेच असेल की पाय धारावीत अशी व्यक्तिमत्त्व आपल्याला दिसत नाहीत तर आपण पाहतही नाही.
गांधीजींनी त्यांच्या विचाराद्वारे मूल्याद्वारे आपल्याला आपल्याकडे पाहण्याचा आरसा दिला होता. या आरश्यात आपण विद्रुप दिसलो म्हणून स्वतःला सुधारण्याऐवजी आपण आरसाच फोडला. गांधीजींचे विचार आम्हाला आमच्यातील दुर्गुण ओळखण्यास भाग पाडतात, पण ते स्वीकारण्याऐवजी आम्ही गांधीजींनाच नाकारल. आजच्या गतिमान उपभोगवादी परिस्थितीन आम्हाला इतकं कोडग आणि कठोर केलं आहे की स्वतःला बदलवून गांधीजींचे विचार आत्मसात करण्याइतकी लवचिकता आम्ही गमावून बसलोय. आजच्या जयंती निमित्ताने का होईना गांधीतत्व आपण स्वीकारायला काही हरकत नाही असे मला वाटते.










Leave a Reply