Dehu News : प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी केले पूर्व प्राथमिक विभागातील बालचमूंचे स्वागत

Dehu News : प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी केले पूर्व प्राथमिक विभागातील बालचमूंचे स्वागत

pckhabar- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशन च्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल चा आज पहिलाच दिवस! आज नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले आणि शाळेतील लगबगीने चैतन्याचा शिडकावा करत मुलांना सुखद गारवा देण्याचा प्रयत्न केला. मुलांचा शाळेतील पहिला दिवस अविस्मरणीय ठरण्यासाठी शाळेत आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण केले गेले.

सकाळी ८.30 वाजता यु.के.जी. मुलांच्या स्वागतासाठी इयत्ता पाचवी व सहावी च्या विद्यार्थ्यांनी तर ११.३० वाजता नर्सरी आणि एल.के.जी. मुलांच्या स्वागतासाठी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा शाळेचा पहिला दिवस असूनही या बालचमूंचे स्वागत केले. मोठे दादा व ताईंनी शाळेत येणाऱ्या आपल्या लहान भावंडांचे टाळ्या वाजवून व फुलांचा वर्षाव करुन दिमाखदार स्वागत केले. शाळेतील सहशिक्षिकांनी मुलांचे औक्षण करून नवीन शैक्षणिक वर्ष आनंददायी जाण्यासाठी मुलांना शुभाशिर्वाद दिले.

मुलांना आवडणारे कार्टून म्हणजे टाॅम ॲड जेरी, यांचा पेहराव परिधान करून शाळेतील दादा व मावशींनी या लहान मुलांचे मनोरंजनात्मक स्वागत केले. पालकवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या मुलांचे हे क्षण कॅमेऱ्यात कैद केले.
प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी हायफाय, शेकहॅंड, नमस्ते या ॲक्टिव्हिटीचा आनंद लुटत शाळेत प्रवेश केला. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी टुडेज स्टार म्हणून स्वतःलाच आरशात पाहून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली.
यावेळी सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, सचिव प्रा. विकास कंद, प्राचार्या डॉ. कविता अय्यर, पूर्वप्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सुब्बलक्ष्मी पाठक, उपप्राचार्या शैलजा स्वामी, सर्व क्रीडा शिक्षक तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.