Dehu News : कार्यकर्तृत्वाने आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतील, तोच जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार : प्रा. यशवंत गोसावी

Dehu News : कार्यकर्तृत्वाने आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतील, तोच जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार : प्रा. यशवंत गोसावी

श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे सृजनदीप व्याख्यानमाला

गड किल्ल्यांचे अभ्यासक निलेश गावडे यांचे आज ‘गड किल्ले – महाराष्ट्राचे वैभव’ या विषयावर व्याख्यान

Pckhabar- जगात अनेक पुरस्कार सर्वश्रेष्ठ मानले जातात पण खरा पुरस्कार तोच ज्याने आपल्या आईवडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळतील… या आनंदाश्रूसाठी प्रत्येक पाल्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. आपण काय मिळवावं, काय गाठावं, मुलांना काय शिकवावं, यासाठी पालकांनी आधी छत्रपतींना समजून घेतले पाहिजे व मुलांनाही समजून सांगितले पाहिजे असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक, लेखक, व्याख्याते, शिवनिश्र्चल सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. यशवंत गोसावी सर यांनी केले.

श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल आयोजित सृजनदीप व्याख्यानमालेत पालकांना मार्गदर्शन करताना प्रा. यशवंत शिंदे सर पुढे म्हणाले की ‘एक आई स्वराज्य उभं करु शकते, त्या आईचं नाव आहे जिजाऊ… आणि आपल्या आईवडिलांच्या इच्छापूर्तीसाठी, स्वराज्य उभं करत स्वतः च्या आयुष्यात संघर्ष निर्माण करुन घेतला त्या मुलाचं नाव आहे शिवाजी… आपण तानाजी, सूर्याजी, बाजीप्रभू, येसाजी, जीवा, बहिर्जी… छत्रपतींचे सवंगडी म्हणून ओळखतो. पण हे सवंगडी छत्रपतींचे नाहीत तर ते जिजाऊंनी जोडून दिलेले मित्र आहेत. आपल्या मुलाचे मित्र कोण यावर त्याचं भविष्य अवलंबून असतं. मित्र चांगले तर वळण चांगलं, मित्र वाईट तर वळण वाईट, हे साधं तत्वज्ञान जिजाऊंना माहीत होतं म्हणूनच अशी माणसं शिवबाला जोडून दिली की रयतेसाठी स्वराज्य उभं करता आलं. आजच्या जिजाऊंनी याचं अवश्य चिंतन करावं. शिवाजी महाराजांनी त्याकाळात उत्तमोत्तम टेक्नॉलॉजीचा वापर केला. आजही जर छत्रपती असते तर टेक्नॉलॉजीचा समाजहितासाठी नक्कीच वापर केला असता. पण आज पालक आणि मुले टेक्नॉलॉजीचा असा वापर करतायत… ज्यातून आपल्या मुलांना Reels Star बनवायचं की Real Star बनवायचं… हा विचार करायची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रायगडावर रिकाम्या हाती चालणे अशक्य तिथे बलाढ्य हत्ती राज्याभिषेकासाठी गडावर लहान असताना आणले गेले, हे १० वर्षांपुढील नियोजन छत्रपतींनी केले होते. भविष्याचा वेध घेण्याची दूरदृष्टी छत्रपतींकडे होती. आज मुले रोजचा होमवर्क पूर्ण करण्याचे नियोजन करतात का? मोठं होऊन मला काय व्हायचंय याचं नियोजन करतात का? आईवडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जिवाचं रान करतात का? इथे आईवडिलांचे वाटे घातले जातात ही शोकांतिका आहे. म्हणूनच मुलांना छत्रपती समजून सांगितले पाहिजे. जिजाऊंकडे पाहून शिवबाच्या अंगात बारा हत्तीचे बळ येत होते तसे आपल्या आईला पाहून मुलांमध्ये बळ निर्माण व्हावे अशी जिजाऊ प्रत्येक आईने बनलं पाहिजे तेव्हाच शिवाजी घडतील.’

जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांना समाजाने खूप त्रास दिला, पण त्यांनी संघर्ष केला म्हणूनच आज त्यांना देवत्व प्राप्त झाले. तसे चांगल्या कामाला समाजाकडून विरोध होणार पण तरी आपण ते काम नेटाने पुढे सुरु ठेवले पाहिजे. आपल्या समाजात सृजनशील पिढी घडविण्याचे काम अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल सृजनदीप व्याख्यानमालेतून करीत आहे. छत्रपतींचे विचार पालक व विद्यार्थ्यांमध्ये उतरावेत व त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून ही सृजनदीप व्याख्यानमाला… आजकाल शाळांमध्ये शिक्षण हा एक व्यवसाय बनत चालला आहे पण अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिक्षण हा व्यवसाय नसून ही एक सेवा आहे म्हणूनच या शाळेत तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल आहे असे मत प्रा. यशवंत गोसावी यांनी व्यक्त केले.

इतिहास संशोधक, लेखक संदीप तापकीर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. इंद्रायणी साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. सीमा काळभोर, श्रीक्षेत्र देहूचे उपनगराध्यक्ष सुधीर काळोखे, निघोजे गावच्या सरपंच सुनिता येळवंडे, ग्रामपंचायत सदस्य सागर येळवंडे, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, सचिव प्रा. विकास कंद, उपप्राचार्या शैलजा स्वामी आदी मान्यवर याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

इयत्ता तिसरी,चौथी व पाचवीचे विद्यार्थी तसेच पालक या व्याख्यानमालेसाठी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी केले तर व्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांचा परिचय सहशिक्षिका स्नेहल शिंदे यांनी करून दिला. सहशिक्षिका वृषाली आढाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर योगिता नांगरे यांनी आभारप्रदर्शन केले.