Dehu News: पालकांनो मुलांना मोठी स्वप्न दाखवा… पण ती त्यांच्यावर लादू नका – प्रा. गणेश शिंदे

Dehu News: पालकांनो मुलांना मोठी स्वप्न दाखवा… पण ती त्यांच्यावर लादू नका – प्रा. गणेश शिंदे

श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे सृजनदीप व्याख्यानमाला

पालकांचा उदंड प्रतिसाद
Pckhabar- आपल्या मुलांना मोठी स्वप्न नक्की दाखवा याचा अर्थ ती त्यांच्यावर लादा असं होत नाही. पालकांनी आपल्या मुलांमधील स्ट्रेंथ ओळखायला हवी. आऊसाहेबांनीदेखील शिबवामधील नेतृत्वगुण, हळवा कोपरा, दूरदृष्टी हे गुण ओळखून त्यांना हिंदवी स्वराज्य निर्माण करायला सांगितले. द्रौपदीला फरफटत राजदरबारात आणले हे क्रौर्य आहे तर लांज्याच्या पाटलाची उचलबांगडी केली हे शौर्य आहे. आपल्या मुलांना हे शौर्य शिकवा. आपले ज्ञान आणि आपली कृती समाजहितासाठी असली पाहिजे याची त्यांना जाणीव करुन द्या. पालकांना मुलांमधील गुण हेरता आले पाहिजेत. मुलांच्या छंदांच्या व करीयरच्या जागा यामध्ये पालकांनी गफलत करु नये असे स्पष्ट प्रतिपादन युवा कीर्तनकार, लेखक, विचारवंत, गीतकार प्रा. गणेश शिंदे यांनी केले.

श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलने आयोजित केलेल्या सृजनदीप व्याख्यानमालेत ‘राजमाता जिजाऊ माँसाहेब – संस्कारपीठ’ या विषयातून प्रा. गणेश शिंदे सरांनी पालकांना मार्गदर्शन केले. मुलांसमोर आपल्या आचरणातून आदर्श निर्माण केले पाहिजे. आजच्या काळातील लहान मुलं रडली तर ती मोबाईलमुळे शांत होतात व आपले रडणे थांबवतात. मुलांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा मुलांना आपला वेळ द्या. मोबाईल हे व्यसन बनत चालले आहे म्हणूनच दारु व्यसनमुक्ती केंद्रांसारखी आता मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र उभारावी लागणार आहेत ही शोकांतिका आहे. वेळ आणि काळ नावाच्या दोन तलवारी मुलांच्या हाती देऊन त्यांना संघर्ष करायला पालकांनी शिकवलं पाहिजे. अंथरूण पाहून पाय पसरावे असे सांगितले जाते… परंतू पालकांनी मुलांना म्हटले पाहिजे की, अंथरुणाची काळजी करु नकोस ते पुरवायला आम्ही खंबीर आहोत. मुला-मुलींनी आई बापाची मान खाली जाईल असे न वागता आपले नाव इतके मोठे करा की त्या नावाने आपले आईवडील ओळखले गेले पाहिजेत. जिजाऊंमुळेच शिवबा घडले म्हणूनच राजमाता जिजाऊ माँसाहेब या एक संस्कारपीठ आहेत, अशा समर्पक शब्दात शिंदे सरांनी ‘राजमाता जिजाऊ माँसाहेब – संस्कारपीठ’ हा विषय उलगडला.

श्रीक्षेत्र देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सौ. निवेदिता घार्गे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. शिवाजीमहाराज मोरे, नगराध्यक्षा सौ. पूजा दिवटे, शिवव्याख्यात्या सीमा तरस, गिर्यारोहक, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, उपप्राचार्या सौ. शैलेजा स्वामी आदी मान्यवर याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

इयत्ता तिसरी, चौथी व पाचवीचे विद्यार्थी तसेच व्याख्यानमालेच्या या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद देत बहुसंख्येने पालक श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी केले तर व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांचा परिचय सहशिक्षिका सौ. रेखा अडागळे यांनी रसिक श्रोत्यांना करून दिला. सौ. वृषाली आढाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सौ. निलिमा अहिरराव यांनी आभारप्रदर्शन केले.