Pcmc Tax Department News : जुनी थकबाकी वसूलीचा पिंपरी महापालिकेचा ‘पॅटर्न यशस्वी’

Pcmc Tax Department News : जुनी थकबाकी वसूलीचा पिंपरी महापालिकेचा ‘पॅटर्न यशस्वी’

चालू आणि थकबाकी वसूलीचा वाढता आलेख

आर्थिक वर्षातील साडेसहा महिन्यात 65 टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर
604 कोटी रुपयांचा महसूल महापालिका तिजोरीत

Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षांत कर वसुलीची नवं-नवीन विक्रम केले आहेत. यामध्ये वर्षानुवर्षे करदात्यांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी होती. हा थकीत कर वसूल करण्यात महापालिकेच्या कर संकलन विभागाला यश आले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल साडेतीनशे कोटी तर 2023-24 या आर्थिक वर्षातील साडेसहा महिन्यात तब्बल 201 कोटी रुपयांची जुनी थकबाकी वसुली केली आहे. आत्तापर्यंत चालू आर्थिक वर्षात महापालिका इतिहासात प्रथमच 604 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा  6 लाख 7 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत.  या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. या विभागाच्या वतीने  विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटीसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाव्दारे जनजागृती, महत्त्वाच्या चौकात होर्डिंग्ज, रिल्स स्पर्धा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर याचबरोबर
प्रत्येक व्यक्तीला त्याची मालमत्ता कराची रक्कम आणि सवलतीची रक्कम सांगणारा customised sms पाठवला जात होता. अशा विविध बाबींमुळे 2023-24 च्या साडेसहा महिन्यात 604 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी तीव्र मोहीम हाती घेण्यात आली असून  थकबाकीदार तत्काळ थकीत कर भरत आहेत.

शहरातील मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी होती. थकबाकी वसूल होत नसल्याने दरवर्षी हा आकडे वाढतच होता. मात्र, या विभागाची जबाबदारी सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी थकबाकी वसुलीसाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुक्ष्म नियोजन, आराखडा तयार केला. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून थकबाकी वसूलीचा आलेख उंचावत आहे. थकबाकीदारांची चालू कर आणि थकीत कर भरण्याकडे कल वाढत असल्याने 2022-23 आणि 2023-24 मध्ये आतापर्यंत तब्बल 555 कोटी रुपयांची जुनी थकबाकी वसूल केली आहे. यामध्ये प्रामुख्याने निवासीसह बड्या थकबाकीदार बिगर निवासी मालमत्ता धारकांकडून कर वसूल केला आहे.

दरम्यान, महापालिकेच्या इतिहासात साडेसहा महिन्यात कर संकलन व कर आकारणी विभागाला 65 टक्के मालमत्ता धारकांचा 604 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात यश आले आहे. उर्वरित साडेपाच महिन्यात 35 टक्के करदात्यांचा कर आणि थकीत कर वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

आकडे बोलतात
गेल्या तीन वर्षांतील थकबाकी वसुलीचा वाढता आलेख
वर्ष             थकीत कर वसूल
2021-22.   269 कोटी
2022-23.    354 कोटी
2023-24.   201 कोटी ( साडेसहा महिन्यात)

600 कोटी रुपयांची थकबाकी
महापालिकेच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात येत असतानाही अनेकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकीत आहे. यामुळे  2023-24 या आर्थिक वर्षात कर संकलन विभागाने 41 हजार, 307 जणांना जप्ती नोटीसा तर 36 हजार 719 मालमत्ता धारकांना जप्ती पत्रे धाडली आहेत. या मालमत्ता धारकांकडे तब्बल 600 कोटी रुपयांचा कर थकीत आहे.

असा आला रूपया
ऑनलाईन – 380 कोटी 6 लाख
विविध ॲप – 5 कोटी 24 लाख
रोख.       –  78 कोटी 25 लाख
धनादेशाद्वारे – 62 कोटी 1 लाख
आरटीजीएस – 32 कोटी 92 लाख
इडीसी-  6 कोटी 97 लाख
एनईएफटी – 4 कोटी 89 लाख
डीडी-   4   कोटी 53 लाख

कर संकलन विभागास गतवर्षीच्या जप्त मालमत्तांचा लिलाव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शासनाच्या सातबारा संगणकीकरण धर्तीवर शहरातील मालमत्तांचा मालमत्ता उतारा करण्यात यावा यासाठी विशेष बैठक घेऊन निर्देश देण्यात आले आहेत. पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले जात आहेत.
:- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

गेल्या आठवड्यात सर्व मंडल अधिकारी, प्रशासन अधिकारी यांची बैठक घेतली आहे. त्यात त्यांना अधिकाधिक पारदर्शी कामकाज कसे करता येईल याची कार्यप्रणाली ठरवून देण्यात आली आहे. तसेच जप्ती मोहीम कशा पद्धतीने राबवता येईल याचा कालबद्ध कार्यक्रम आखून देण्यात आला आहे. शहरात चालू असलेले सर्वेक्षण पालिकेच्या एकूण आर्थिक स्थितीबाबत क्रांतिकारी ठरणार असल्याने त्यात कुठल्या त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.
प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

जप्ती मोहीम आणि सर्वेक्षण यांची निश्चित करून दिलेली लक्ष्ये साध्य करण्यासाठी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी कटिबध्द आहेत. वर्षानुवर्षे थकीत असलेली रक्कम वसूल करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहे. आतापासूनच जप्ती मोहिमेने वेग घेतलेला असून या आर्थिक वर्षात सर्वाधिक थकबाकी वसूल करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
:- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका