‘राष्ट्राचा खरा इतिहास कलावंतांच्या कलाकृतीमध्ये आढळतो’

ही बातमी शेअर करा.

‘राष्ट्राचा खरा इतिहास कलावंतांच्या कलाकृतीमध्ये आढळतो’
Pckhabar- असं म्हणतात, प्रत्येकाला नजर असते; परंतु घडणाऱ्या, आसपास असणाऱ्या बाबींमधील सौंदर्य बघण्याची ‘दृष्टी’ कलाकारालाच मिळालेली असते. कवी आपल्या काव्यातून जे दिसले, अनुभवले ते मांडतो. चित्रकार आपला भोवताल आपल्या दृष्टिकोनातून पाहतो आणि तो रेखाटतो. कलाकाराने जे काही टिपलेले, लिहिलेले, रेखाटलेले असते ते कायम आपल्याला वेगळ्या अनुभव विश्वात घेऊन जाते. जे कलाकार आपल्या भोवतालाबाबत बोलतात ते कलाकार फक्त आपली कलाकृती मांडत नाहीत, तर ते त्या बाबी इतिहासरूपाने पुढील पिढीस सुपूर्द करतात. प्रसिद्ध लेखक जेम्स कझिन्स एका ठिकाणी असं म्हणतो की, “राष्ट्राचा खरा इतिहास लढायांच्या आणि राजघराण्यांच्या दस्तावेजांपेक्षा कलावंतांच्या कलाकृतीमध्ये अधिक आढळतो.” त्याप्रमाणे इथले बदलते समाजजीवन, इथले संस्कार, मानवी भावभावना, अभिव्यक्ती यांचे सार अन्वर यांच्या चित्रांमधून प्रकट होते, अशा शब्दांत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘द सिंफनी ऑफ टाईम’ या अन्वर हुसेन यांच्या चित्रांचे पुण्यात होणाऱ्या प्रदर्शनाचे औचित्य साधून सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी एक विशेष लेख लिहिला आहे.

अन्वर हुसेन… महाराष्ट्रातील नावाजलेल्या चित्रकारापैकी एक नाव. वास्तववादी, वास्तवदर्शी चित्रांमधून समाजजीवनाचा अचूक वेध घेणारा चित्रकार. बदलणारा भोवताल, बदलणारे समाजजीवन हा अन्वर यांच्या चित्रांचा महत्त्वाचा भाग आहे.
अन्वर मूळचे बुधगाव इस्लामपूर, सांगली येथील. कलेचा वारसा लाभल्याने ते चित्रकलेकडे वळले. त्यांनी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून ‘जी.डी. आर्ट’ची पदविका घेतली.
अन्वर यांची आत्तापर्यंत ९ एकल चित्रप्रदर्शने झाली आहेत. पु्ण्यामधील ‘गोवन रॅप्सोडी’, ‘नॉस्टॅल्जीया’, ‘बायोग्राफी ऑफ सिटी’, ‘क्लासिकल मास्टर्स’ आणि ‘पावसाची चित्रे’ आदी प्रदर्शने गाजली. मुंबई, पुणे आणि देशातील विविध ठिकाणी भरविलेल्या प्रदर्शनाला रसिकांनी कायम उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अन्वर यांच्या चित्रप्रदर्शनातून माणसांच्या मूर्त-अमूर्त कल्पनांना उजाळा मिळाला. अन्वर यांची प्रयोगशील चित्रकार म्हणूनही ओळख कलारसिकांमध्ये झालेली आहे. ‘हायवेपलीकडच्या गावात’ हे डिजिटल चित्रप्रदर्शन त्याचेच एक उदाहरण. इंडिया आर्ट गॅलरी, आर्ट फ्ल्यूटसारख्या अनेक वेबसाईटवर त्यांची चित्रे पाहायला मिळतात. अन्वर यांनी आजपर्यंत अनेक पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे काम केलेले आहे. बहिणाबाईंच्या कवितांचा इंग्रजीत अनुवाद असलेल्या ‘फ्रॅगरन्स ऑफ द अर्थ’ पुस्तकाचे मुखपृष्ठ अन्वर यांनी रेखाटले. याशिवाय नागनालंदा प्रकाशन आणि ‘लस्ट फॉर लालबाग’, ‘जू’ या गाजलेल्या व ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानित लेखक दामोदर मावजो यांच्या ‘जीव द्यावा की चहा घ्यावा’ या मराठी अनुवादित पुस्तकांसाठी मुखपृष्ठ त्यांनी रेखाटली आहेत. अन्वर यांना १९९८ साली ‘महाराष्ट्र राज्य कला पुरस्कार’, २०२१ रोजी मिळालेला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा ‘उत्कृष्ट मुखपृष्ठ पुरस्कार’सारख्या अनेक पुरस्कारांनी आजपर्यंत गौरविण्यात आले आहे.

माणसांच्या जीवनातील सहजता, रोमॅण्टीसिझम, बदलते समाजमन व समाजजीवन यांचा वेध त्यांच्या चित्रातून मुख्यत्वे दिसतो. त्यामुळे रसिकांना त्यांच्या चित्रामध्ये आपला भोवताल दिसतोच; परंतु चित्रकाराचे भाष्यही समजण्यास मदत होते. अन्वर हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन दि. २२ मे पर्यंत पुण्यातील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु असणार आहे.

द सिंफनी ऑफ टाईम
‘द सिंफनी ऑफ टाईम’ हे प्रदर्शनाचे नाव असून, अन्वर हुसेन यांनी आपल्या चित्रांमधून ज्याप्रमाणे काळाची अभिव्यक्ती मांडलेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी समाजमनाचा वेध घेताना, ज्या बाबींचा उलगडा झाला, त्या बाबी प्रदर्शनातील चित्रांतून उलगडणार आहेत. चित्रकाराने आजपर्यंत पाहिलेल्या, जगलेल्या अनेक बाबींतून त्याला स्वत:चा शोध लागला आहे. चित्रकलेच्या माध्यमातून स्वत:चा शोध घेणाऱ्या चित्रकाराला एका टप्प्यावर काळाची एक धून ऐकू येते. त्याप्रमाणेच अन्वर यांनी अनुभवलेल्या ‘द सिंफनी ऑफ टाईम’ या प्रदर्शनातून कलारसिकांना चित्रकाराच्या कलाविश्वातून भावविश्वात प्रवेश करावयास मिळणार आहे.

नीलेश देशमुख
सहाय्यक आयुक्त
पिंपरी-चिंचवड महापालिका


ही बातमी शेअर करा.