Chinchwad News: काम पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत शौचालय राष्ट्रवादी काँग्रेस व पँथर रिपब्लिकन पार्टी (एस)ने केले खुले
Pckhabar- गेल्या अनेक महिन्यांपासून काम पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत पिंपळे गुरव येथील काटेपूरम चौकानजिक बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप व पँथर रिपब्लिकन पार्टी (एस) चे संस्थापक अध्यक्ष गौतम डोळस यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्ण झाले. मात्र, तरीही महापालिका प्रशासनाकडून या शौचालयाचे उद्घाटन रखडवलेले होते. परिणामी नागरिक या शौचालयाच्या आडोशाला लघुशंका करीत होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने रोगराईची शक्यता नाकारता येत नव्हती. शेजारीच बॅडमिंटन हॉल, जलतरण तलाव असल्याने इथे येणाऱ्या लहान मुले, नागरिक यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता.
नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तरी महापालिकेने या शौचालयाचे उद्घाटन करणे अत्यावश्यक होते. मात्र, महापालिकेचा आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले. महिला व नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या हस्ते फीत कापण्यात आली. तसेच पँथर रिब्लिकन पार्टी (एस)चे संस्थापक अध्यक्ष गौतम डोळस यांच्या हस्ते नारळ फोडून सदर शौचालय परिसरातील नागरिकांनी खुले करण्यात आले. शौचालय खुले करण्यात आल्याने परिसरातील नागरिक, दुकानदार, विक्रेते यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, सरचिटणीस उदय ववले, संजय गोसावी, केशव कांबळे, श्री. पिल्ले आदी उपस्थित होते.
काम पूर्ण होऊनही केवळ भाजपच्या सांगण्यावरून महापालिका प्रशासन हे शौचालय नागरिकांसाठी खुले करण्यास टाळाटाळ करीत होते. नागरिकांच्या आरोग्याचा तरी प्रशासनाने विचार करायला हवा होता. मात्र, राजकीय पुढाऱ्यांची तारीख मिळत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे चुकीचे आहे. नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊनच आम्ही हे सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी खुले केले आहे.
-राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक
Leave a Reply