Chinchwad News : मोहननगरमधील श्री छत्रपती राजश्री शाहू महाराज जलतरण तलाव चार वर्षांपासून बंद

Chinchwad News : मोहननगरमधील श्री छत्रपती राजश्री शाहू महाराज जलतरण तलाव चार वर्षांपासून बंद

तलाव दुरूस्त करून तत्काळ सुरू करा; युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांची मागणी

पिंपरी-चिंचवड : एप्रिल महिना सुरू झाला असतानाच उन्हाचा चटकाही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, महापालिकेचा मोहननगर येथील जलतरण तलाव गेल्या चार वर्षांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांमधून पालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या जलतरण तलावाची तत्काळ दुरूस्ती करून सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांनी केली आहे. तसेच तलावाजवळ असलेले क्रीडागण, हॉलीबॉल, स्केटींग गाऊंड, टेनिस लॉनची दुरूस्ती करावी, अशी मागणीही काळभोर यांनी केली आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात विशाल काळभोर यांनी म्हटले आहे की, महापालिकेचे शहराच्या विविध भागातील 13 जलतरण तलावांपैकी 8 तलाव सुरू असून 5 तलाव बंद आहेत. मोहननगर येथील छत्रपती श्री राजश्री शाहू महाराज जलतरण तलावावर मोहननगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, आकूर्डी, रामनगर, इंदिरानगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर यासह आदी भागातील नागरिक, मुले पोहण्यासाठी येत होते. मात्र, हा तलाव करोनाच्या अगोदरपासून खोली कमी करण्याच्या नावाखाली बंद आहे. हा तलाव नियमापेक्षा जास्त म्हणजे 14 फूट खोल झाला आहे. तसेच मोहननगर जलतरण तलावाजवळच महापालिकेचे क्रीडांगण, हॉलीबॉल, स्केटींग गाऊंड, टेनिस लॉनची दुरावस्था झाली असून पालिकेचे दुर्लक्ष झाले असून त्वरित दुरुस्त करावे, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.

विशाल काळभोर पुढे म्हणाले, मोहननगर जलतरण तलावावर पोहण्यासाठी येणाऱ्यांची सातत्याने गर्दी असायची. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हा जलतरण तलाव बंद असल्याने खेळाडू, शालेय मुले, इतर नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. या जलतरण तलावातून महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळत होते. असे असताना क्रीडा विभाग आणि स्थापत्य विभागाच्या गलथान कारभार आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव
असल्याने हा तलाव बंद आहे. उन्हाळ्यापूर्वीच या तलावाचे काम होणे अपेक्षित होते. मात्र, एप्रिल महिना सुरू झाला असतानाही तलाव बंद आहे. तसेच तलावाजवळच पंतप्रधान आवास योजनेचे कामकाज पूर्ण झाले आहे. त्यामुळे तलावाचे काम करताना महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तलावावर छतही बसविण्यात यावे, असेही काळभोर म्हणाले.

स्थापत्य विभाग लवकरच निविदा काढणार
मोहननगर येथील तलावाची खोली 14 फूट आहे. त्यामुळे ही खोली जास्त असून ती कमी करण्यासह विविध कामे करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे पालिकेच्या स्थापत्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.