Dehu News : माझा महाराष्ट्र…माझा अभिमान या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जोपासत केले बहारदार नृत्यांचे सादरीकरण

Dehu News : माझा महाराष्ट्र…माझा अभिमान
या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जोपासत केले बहारदार नृत्यांचे सादरीकरण

सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार

Pckhabar – सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. ‘माझा महाराष्ट्र… माझा अभिमान’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील‌ सांस्कृतिक विविधता आपल्या बहारदार नृत्य शैलीतून सादर केली.

यावेळी इ. पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी भूपाळी, वासुदेव पासून शेतकरी, आदिवासी, कोळी, गोंधळ, मंगळागौर, पालखी सोहळ्याची परंपरा जोपासत दहीहंडी, गणेशोत्सव, होळी, गुढीपाडवा या मराठमोळ्या सणांचा आपल्या नृत्यातून मागोवा घेतला. कार्यक्रमाच्या अखेरीस सादर झालेला शिवराज्याभिषेक सोहळ्याने शाळेच्या परिसरात एक नवचैतन्याची ऊर्जा निर्माण केली. आपल्या पाल्यांचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. या स्नेहसंमेलनाची सर्व सूत्रे इ. तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांनी आपल्या हाती घेत सूत्रसंचालनापासून ते आभारप्रदर्शनापर्यंतचा हा स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडला. सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा.विकास कंद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी ‘माझा महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित वर्षभर शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा वार्षिक अहवाल दृकश्राव्य माध्यमातून सादर केला. याप्रसंगी हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मा. एन.बी.जाधव, माजी उपप्राचार्य मा. बी. एस. पठारे, देहूच्या नगराध्यक्षा सौ. स्मिता चव्हाण, महिंद्रा अँड महिंद्रा लॉजिस्टिकचे व्यवस्थापक मा. निंबा भामरे, पिं.चिं.शहराचे माजी नगरसेवक मा. राजाभाऊ गोलांडे, ज्योतिषाचार्य, गुरुवर्य दत्तात्रय अत्रे, देहू देवस्थानचे माजी विश्वस्त प्रा. सुभाषबाबू मोरे, सृजन फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार ॲड. संजय भसे, उद्योजक मा. संपत शेटे, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद, देहूच्या नगरसेविका सौ. पूनम काळोखे, सौ. पूर्णिमा परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. अवघ्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलने केलेल्या प्रगतीचे कौतुक करीत या स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य एन. बी. जाधव सर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबविणाऱ्या सृजन फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे तसेच स्कूलच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर व सर्व शिक्षकवृंदाचे मनःपूर्वक कौतुक केले. तसेच या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे भविष्य निश्चितच उज्वल असेल व पालक देखील भाग्यवान आहेत अशी भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाची संपूर्ण रुपरेषा म्हणजे महाराष्ट्रातील परंपरा व सांस्कृतिक वैभव अधोरेखीत करणारी नाटीका… परदेशात असलेल्या आपल्या पुतण्याला म्हणजेच श्रीरंगला (अथर्व हिंगे – इ.चौथी) त्याचे देहूत राहणारे काका श्री. देशमुख (समर्थ दोनगहू – इ.चौथी) आणि त्यांची मुलगी आनंदी (गाथा चरपे- इ. तिसरी) महाराष्ट्रातील या सांस्कृतिक वैभवाची एकेका नृत्यप्रकारातून ओळख करून देतात. इ. तिसरीतील वैभवी डोळस व आराध्य माने यांनी संपूर्ण नाटिकेला एका सूत्रात बांधून प्रभावीपणे सूत्रसंचालकांची जबाबदारी पार पाडली. तर इ. चौथीतील अथर्व माने याने आभार प्रदर्शन केले.