Dehu News : ‘जागरूक पालक सुदृढ बालक’ अभियानाचा देहूत प्रारंभ
परिसरातील सुमारे ११ हजार विद्यार्थ्यांची होणार तपासणी
Pckhabar- राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत संपूर्ण राज्यात ९ फेब्रुवारी पासून ‘जागरूक पालक सुदृढ बालक’ विशेष अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. देहू प्राथमिक आरोग्य केंद्रात नगराध्यक्ष स्मिता चव्हाण, महिला बालकल्याण समिती सदस्य पौर्णिमा परदेशी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख सुनील हगवणे यांच्या हस्ते या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात ते आहे. यामध्ये ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
या अभियानाच्या माध्यमातून देहू परिसरातील ० ते १८ वयोगटातील सुमारे ११ हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट्य आहे. तसेच तपासणी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक असे एकूण ३० हजार मोफत आभा कार्ड काढून देण्यात येणार आहे.
–डॉ. किशोर यादव, मुख्य वैद्यकीय अधिकारी, देहू प्राथमिक आरोग्य केंद्र.
या आजारावरील तपासण्या होणार
या तपासणीमध्ये बालकांचे दुभंगलेले ओठ आणि टाळू, जन्मजात मोतीबिंदू ,जन्मजात बहिरेपणा, डोळ्यांचा तिरळेपणा, लहान मुलांमधील हृदयविकार, कर्करोग व अशा अनेक आजारावरील तपासण्या करून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
या अभियानाच्या माध्यमातून बालकांची मोफत वैद्यकीय तपासणी आणि शस्त्रकिया मोफत होणार आहेत. त्यामुळे देहू नगरपरिषद हद्दीतील पालकांनी आपल्या मुलांची तपासणी करून घ्यावी.
—स्मिता चव्हाण, नगराध्यक्षा, देहू.
अभियानाची उद्दिष्टे:-
● राज्यातील १८ वर्षावरील सर्व मुला-मुलींची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा.
● सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन सुविधा.
● ० ते १८ वर्षापर्यंतच्या बालकांची/ किशोरवयीन मुला–मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी.
● आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार.
● गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार. (उदा. औषधोपचार, शस्त्रक्रिया, ई.)
● प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा.
● सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन.
Leave a Reply