Moshi News : मोशीत उद्या राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याचे आयोजन 

Moshi News : मोशीत उद्या राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याचे आयोजन

Pckhabar -श्री स्वामी समर्थ सेवा सत्संग आयोजन समितीच्या वतीने उद्या शनिवारी (दि. ११) सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याचे मोशी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंशन केंद्र येथे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, या मेळाव्यात सर्वधर्मीय वधुवर परिचय मेळावा, महारोजगार मेळावा, व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन, सव्वा कोटी श्री गणपती अथर्वशीर्ष आवर्तन, श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठण, संत तुकाराम महाराजांचे अभंग व पसायदान पठण, २०० तज्ज्ञ  डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

हा मेळावा ११ लाख भाविकांच्या उपस्थितीत संप्पन होत असून, या मेळाव्यात ग्राम आणि नागरी विकास अभियानात १८ विभागाद्वारे गर्भसंस्कार, शिशु संस्कार, बालसंस्कार, युवा प्रबोधन, कृषी, विवाह संस्कार, प्रश्नोत्तरे, वास्तुशास्त्र, वेद विज्ञान, पर्यावरण, दुर्ग संवर्धन, पशु व गौवंश संवर्धन, स्वयंरोजगार, भारतीय संस्कृती, कायदा जागरूकता, आरोग्य आणि आयुर्वेद, आयटी विभाग, प्रशिक्षण विभाग, देश विदेश अभियान विभाग, आणि प्रशासकीय विभाग यांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांचा परिणाम म्हणून आज लाखो लोक व्यसनमुक्त, निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत.

या महासत्संग सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, धर्म व पंथाचे धर्मगुरू, भाविक, स्वामीभक्त, सेवेकरी उपस्थित राहणार आहेत. १५० एकर परिसरात बसेस, कार, मोटारसायकल पार्किंग व्यवस्था, ५० एकर परिसरात भव्य स्टेज व बैठक व्यवस्था, ११ लाख भाविक सेवेकऱ्यांना मोफत अन्नदान व पिण्याच्या पाण्याचे वाटप असे नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा सत्संग आयोजन समिती पुणे तर्फे करण्यात आले आहे.