Chinchwad News : लावणीसम्राज्ञी दीप्ती आहेरने घेतला रसिकांच्या मनाचा ठाव
‘लाखात देखणी’ने पवनाथडीचा समारोप
Pckhabar-यंदाची पवनाथडी उत्साहात पार पडली. पवनाथडीचा समारोप ‘लाखात देखणी’ फेम लावणीसम्राज्ञी दीप्ती आहेर यांच्या लावण्यांच्या कार्यक्रमाने झाला. याला सांगवीकरांनी एकच गर्दी केली होती. टाळ्या, शिट्ट्यांची उत्स्फूर्त दाद देत रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
16 ते 20 डिसेंबर दरम्यान सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षानंतर भरलेल्या या जत्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सुटसुटीतपणा व स्वच्छता हे या जत्रेचे वैशिष्ट्य ठरले. वाघ्या मुरुळी, संबळ, भविष्य बघणारे आदी गोष्टींचाही नागरिकांनी आनंद लुटला. बच्चे कंपनीसाठी बालजत्रा आकर्षित करून गेली.
या जत्रेचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला. गणेश स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लावणीसम्राज्ञी दीप्ती आहेर यांनी आपल्या अदाकारीने तरुण, महिला, वृद्धांसह बच्चे कंपनीला खिळवून ठेवले. रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी लावणीसम्राज्ञी दीप्ती आहेरची वेगळीच छटा पाहायला मिळाली. लावणी फक्त पुरुषांनी पाहिली पाहिजे, हा निकषही दीप्ती आहेरने मोडीत काढला. अगदी छोटी बच्चे कंपनीला स्टेजवर घेत वेगळाच अंदाज रसिकांसमोर सादर केला. कदाचित आतापर्यंतचा हा पहिलाच प्रसंग असावा. म्हणून तर दीप्ती आहेरने अगदी कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनात घर केले आहे. सांगवी, पिंपरी चिंचवड येथे आयोजित पवनाथडी जत्रेच्या समारोपप्रसंगीही खरी लावणी पाहायला मिळाली. डीपाली डीपांग, नाकी डोळी छान रंग गोरापाण, कृष्णा माझ्याकडे पाहू नको या गीतांसह या रावजी बसा भावजी, कारभारी दमानं, पिकलं जांभूळ तोडू नका, बैलगाडा शर्यत भिर्रर्र आदी लावण्यांनी रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला.
या सांस्कृतिक कार्यक्रमाला माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे यांच्यासह माजी नगरसेवक, विविध विभागाचे महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply