Chinchwad News: काळभोरनगरमध्ये रासायनिक पाणी थेट नाल्यात; परिसरातील नागरिक दुर्गंधीने हैराण

Chinchwad News: काळभोरनगरमध्ये रासायनिक पाणी थेट नाल्यात; परिसरातील नागरिक दुर्गंधीने हैराण

नाल्यात पाणी सोडणाऱ्या कंपनीचा शोध घेऊन कडक कारवाई करा

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस विशाल काळभोर यांची आग्रही मागणी

Pckhabar- काळभोरनगर येथे काही कंपन्यांतून रासायनिक पाणी थेट नाल्यात सोडण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांना श्‍वसनाचा त्रास, दुर्गंधीसह कुजट वास येणे, खोकला, सर्दीचा त्रास होत आहे. त्यामुळे रासायनिक पाणी थेट नाल्यात सोडून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या कंपनीचा तातडीने शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस विशाल काळभोर यांनी केली आहे.

याबाबत काळभोर यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, प्रदूषण नियंत्रण महामंडळाला निवेदन दिले आहे.

काळभोर यांनी निवेदनात म्हटले आहे की, काळभोरनगर परिसरातून एक नाला वाहत आहे. परिसरातील कंपनी रात्रीच्या वेळी किंवा दिवसा रासायनिक पाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडते. त्यामुळे काळभोरनगर, सुर्योदय कॉम्प्लेक्‍स, विष्णु विहार, ऐश्वर्यम सोसायटी, जय टॉवर, मोहन नगर आणि लगत असलेल्या दोन शाळेतील मुलांना गेल्या काही दिवसांपासून त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः लहान मुलांना सातत्याने श्‍वसनाचा त्रास, कुजट वास येणे, खोकला, सर्दी असा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाने काळभोरनगरमधील संबंधित कंपनीचा शोध घ्यावा.

याबाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस विशाल काळभोर म्हणाले, काळभोरनगर परिसरात काही कंपन्या आहेत. यापैकी एकाच कंपनीतून रासायनिक पाणी थेट नाल्यात सोडण्यात येत असल्याची शंका आहे. कंपनीचा पालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाला शोध लागत नाही. कंपनी थेट नाल्यात पाणी सोडत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याचा नागरिकांना तसेच परिसरातील लगत असलेल्या दोन शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रासायनिक पाणी थेट नाल्यात सोडण्यात येत असल्याबाबत पिंपरी महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाला आपण वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, पुढे काहीच होत नाही. वास्तविकता कंपनीने रासायनिक पाणी शुध्द करून नाल्यात टाकणे अपेक्षित आहे. मात्र, कंपनी थेट नाल्यात रासायनिक पाणी सोडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. त्यामुळे महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाने तातडीने पाऊले उचलून कंपनीचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी विशाल काळभोर यांनी केली आहे.