Pimpri Newsमिळकत कर विभागाची साडेआठ महिन्यांत ‘रेकॉर्ड ब्रेक’ वसुली

Pimpri Newsमिळकत कर विभागाची साडेआठ महिन्यांत ‘रेकॉर्ड ब्रेक’ वसुली

महापालिका तिजोरीत 501 कोटी जमा

विविध सवलती, जप्ती मोहीमेचा मोठा फायदा ; सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांची माहिती

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील तीन लाख मिळकत धारकांनी साडेआठ महिन्यांत 501 कोटी रुपयांचा मालमत्ता कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. कर आकारणी व कर संकलन विभागाने जाहीर केलेल्या विविध सवलत योजना आणि जप्तीच्या मोहीमेमुळे ‘रेकॉर्ड ब्रेक’ अशी वसुली झाली आहे. तसेच उर्वरित मालमत्ता धारकांनी कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.

शहरात 5 लाख 88 हजार मिळकतींची नोंद आहे. या सर्व मिळकतींना महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत कर गोळा केला जातो. मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधांसह 17 विभागीय कार्यालयात कर भरण्याची सोय करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षांतील साडेआठ महिन्यांत 3 लाख 1 हजार 434 मालमत्ता धारकांनी 501 कोटी 40 लाख रूपये कराचा भरणा केला आहे.

2022-23 या आर्थिक वर्षाचे कर आकारणी व कर संकलन विभागाने 1000 कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किमान 85 टक्के मालमत्तांचा टॅक्स वसूल करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा पल्ला गाठण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी कंबर कसली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील 50 हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या 26 हजार 760, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक 1 हजार 361 तर मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या 3 हजार 850 अशा 31 हजार  971 मिळकत धारकांना जप्तीच्या नोटीसा कर आकारणी व कर संकलन विभागाने दिल्या होत्या. तसेच तीन लाख निवासी मालमत्ता धारकांकडे तब्बल 583 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. अशा थकबाकीदारांवर सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच आतापर्यंत पाचशे कोटींचा टप्पा पार करण्यात या विभागाला यश आले आहे.

याबाबत माहिती देताना सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख म्हणाले, महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा मालमत्ता कर आहे. मात्र, शहरातील तीन लाख निवासी मालमत्ता धारकांकडे तब्बल 583 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. वारंवार कर भरण्याचे आवाहन करून मालमत्ताधारक कर भरत नसल्याने महापालिकेने नाईलाजाने कठोर भूमिका घेत जप्तीची मोहीम राबवली. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सदनिका, व्यावसायिक गाळे जप्त केले आहेत. त्यामुळे थकीत कर वसूल करण्यास चांगले यश येत आहे. तसेच मालमत्ता धारकांनी थकबाकी आणि चालू वर्षाचा कर भरून महापालिकेला सहकार्य करून शहर विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले.

तब्बल दोन लाख मिळकत धारकांनी ऑनलाइन कर भरला

कर भरलेल्या तीन लाख मिळकत धारकांपैकी तब्बल दोन लाख 302 मिळकत धारकांनी 272 कोटी 91 लाख 97 हजार रुपयांचा ऑनलाइन कराचा भरणा केला आहे.

मिळकत कर आकारणी व कर संकलन विभागाच्या सर्व सुविधा ऑनलाइन
मिळकत कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे या विभागाचा पदभार आल्यापासून नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत मालमत्ता धारकांना विविध कर सवलती दिल्या. त्याचबरोबर सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत.

आर्थिक वर्षांतील साडेआठ महिन्यांत 501 कोटी रुपयांचा कर वसूल झाला आहे. मात्र, अद्यापही मोठे लक्ष गाठणे बाकी आहे. करदात्या नागरिकांनी हे लक्ष गाठण्यासाठी कराचा भरणा करुन महापालिकेला सहकार्य करावे.  तसेच कर संकलन विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक