Article By Dr.Anjali Mulke : अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे..!

Article By Dr.Anjali Mulke : अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे..!

Pckhabar- प्रेमाने ओतप्रोत त्याचा चेहरा, आलेल्या प्रत्येकाचं दिलखुलास स्वागत करत आहे..
त्याच्या त्या चेहऱ्यावर, ना कोणाबद्दल घृणा आहे.. ना कोणाबद्दल इर्षा.. ना कोणाबद्दल तिरस्कार.. ना कोणाबद्दल चिडचिड..
इतकं सतत चालून देखील, न थकता, प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीला तो तेवढ्याच आपुलकीने आणि जिव्हाळ्याने बोलतो आहे..
लहान अबाल असो वा वृद्ध .. स्त्री असो वा पुरुष.. सगळ्यांसाठी त्याच्या मनात केवळ आपलेपणाची भावना दाखवत तो हसतमुखाने सर्वांना जवळ घेत चालतो आहे..
विशेषतः हजारो वेगवेगळ्या वयाच्या स्त्रिया त्याला भेटत आहेत..
पण त्याच्या डोळ्यात प्रत्येक स्त्री बद्दल कमालीचा आदर आणि प्रेम दिसत आहे..
त्याची नजर प्रत्येक स्त्रीला यथोचित सन्मान देते आहे..
कोणी त्याला आई वाटतेय.. कोणी बहीण.. कोणी आजी.. तर कोणी लेकरू…!
स्त्रीच काय, भेटणाऱ्या प्रत्येक मनुष्याला तो जवळून अनुभवतो आहे..
कोणाला कमी ना कोणाला जास्त लेखतो आहे..
कुठे किसान पाहतोय तर कुठे जवान..
कुठे अज्ञान तर कुठे विज्ञान..
कित्येक जणांना तो कुठे स्मित हास्याने तर कुठे खळखळून दिलखुलास हसण्याने आपलंसं करून घेत चालतो आहे..!
तो ज्या पद्धतीने लोकांना भेटतोय, न चिडता, न ओरडता.. न वैतागता.. शांतपणे सगळं पाहतोय..
इतके लोक आहेत, त्यात मी एक विशेष वगैरे असल्याचा कसला आव नाही.. कित्येकांच्या कैफियती तितक्याच संयमाने ऐकतोय.. त्यासाठी जिगर लागतं.. तसं एक चांगलं सुसंस्कारित काळीज लागतं..!
अभिनय करणारे ठराविक इंची छातीचे लोक काही मिनिटांचा अभिनय करतील..
पण हा अभिनय नाही..
कित्येक तासांची.. कित्येक दिवसांची ही एक तपश्चर्या आहे..!

ज्या पद्धतीने सामान्य भारतीय लोक त्याला एकदा डोळा भरून पाहून सद्गदित होत आहेत..
ज्याप्रमाणे सामान्य भारतीयांना आपल्या जिव्हाळ्याचा तारणहार आलाय, ही भावना त्याला भेटल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून वाहते आहे..
ज्याप्रमाणे लोक त्याला आपली सर्वोच्च आशा मानत आहेत..
त्यावरून असे दिसत आहे की, सामान्य भारतीय अजूनही ‘भारतीयच’ आहे..
त्याला भेटतांना कोणीही कुठल्या धर्माचा पगडा घेऊन अहंकाराने भेटत नाही आहे..
प्रत्येकजण यावेळी ना कोणी हिंदू आहे.. ना मुस्लिम आहे.. ना सीख इसाई.. कोणी बौद्ध दलित नाही ना कोणी आदिवासी…
ना कोणाला भाषेचा दुराभिमान आहे.. ना कोणाला प्रदेशाचा..
ना कोणालाही आपल्या श्रीमंतीचा भपका दाखवायचा आहे.. ना ही कोणाला गरिबीचे प्रदर्शन मांडायचे आहे…

प्रत्येकजण त्याला भेटतांना केवळ ‘माणूस’ आहे.. त्या यात्रेतील जथ्थ्यातला केवळ एक भारतीय आहे..
फुलातील गुच्छातील एक सर्वसामान्य फूल आहे..
एक सामान्य भारतीय आहे… ज्याला आयुष्यात जगतांना शिक्षण, बेरोजगारी, आरोग्यापासून असंख्य समस्या आहेत..
ज्यांना या सगळ्यांच्या वर्षानुवर्षे जखडणाऱ्या व्यवस्थेच्या अजगरी विळख्यातून सुटायचे आहे..
ज्याला एक सामान्य भारतीय म्हणून सन्मानाने जगायचे आहे..
ज्याला आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आलेला हा जणू देवदूत असावा असा आभास होत आहे..
प्रत्येकाला तोच जीव आहे.. तोच श्वास आहे.. तोच आत्मा आहे.. तीच भूक आहे.. तीच तहान आहे.. त्याच जगण्याच्या मूलभूत गरजा आहेत.. त्याच सर्वांसारख्या सर्व मूलभूत समस्या आहेत..
धर्म, जाती, प्रदेश, भाषेपलीकडे हे सगळी केवळ माणसं आहेत..!

तो या सर्वांना एक आशेचा किरण नव्हे, तर एक आशेचा तळपता सूर्य वाटतो आहे..!
एक प्रचंड आशावाद सगळीकडे या सामान्य जनतेत या एकट्या जीवाने आणून ठेवला आहे..!
प्रत्येक जण यातून भविष्यातील भारताचं एक उत्तम चित्र रेखाटतो आहे..
एक नवीन भारत.. ज्यात खरे स्वातंत्र्य असेल..
ज्यात प्रत्येकाला जगण्यासाठी तितकाच मोकळा श्वास मिळेल..
कोणी उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ न राहता, एकाच पारड्यात समान तोलल्या जाईल..
ज्यात माणसाला केवळ माणूस म्हणून जगता येईल..!!

काही असतात मनात विष घेऊन बसलेल्या व्यक्ती..
ज्यांना त्याने किती किंमतीचा शर्ट घातला, किती शूज बदलले, याचाच जास्त उहापोह आणि कल्ला करायला जास्त आवडत असते..
असे लोक, त्याच्या निखळ वैचारिक शुद्धतेला पारखू शकत नाहीत..
त्याच्या उद्देशांना समजण्याची त्यांची पात्रता नसते..
त्याच्या स्वच्छ भावनांचा त्यांना गंधच नसतो..!
माणूस जेंव्हा विचाराने, अनुभवाने प्रगल्भ होतो, तेंव्हा त्याला एक प्रकारची सिद्धी प्राप्त होते..!
ही सिद्धी त्याला आता जणू प्राप्त झाली आहे..
होय, तो बदलतोय..!!

ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात बालपणापासून आपली रक्ताची नाती या देशावर बली जाताना बघितले आहे.. ज्याने आजपर्यंत राजकारणाकडे फारसे मन लावून बघितले नव्हते पण आता त्याच्या वैचारिक प्रगल्भतेने त्याच्यात एक नवी ताकत ओतली आहे.. तो आज भारताला पुन्हा एकसंध बांधण्याच्या मनिषेने निघाला आहे..!
ज्या गर्दीत त्याची स्वतःची नाती चिंधड्या झाली, त्याच गर्दीला आपलेसे करत तो निघाला आहे..!
राजकीय राक्षसी कटू अनुभवांनी होरपळलेल्या त्याने आज जणू एक चंगच बांधला आहे..
सर्व प्रकारच्या कटुता तो बाजूला सारून सगळ्यांना एक करण्याचा प्रयत्न करतो आहे..!
इथे पारिवारिक सहानुभूती नाही.. तर वैचारिक अनुभूती दिसत आहे..!

देशात एक राजकीय बदल जेंव्हा जेंव्हा हवे होते, तेंव्हा एक पार्टी सत्तेत आली.. एक गेली.. पुन्हा हे चित्र बदलेल.. कोणी येईल, कोणी जाईल.. जसे मा. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजी म्हणाले होते..“सरकारें आएंगी, जाएंगी, पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी मगर ये देश रहना चाहिए..!“

पण आता या यात्रेच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवतेय, की, आता बदल सत्तेत नको आहे..
बदल आता प्रत्येकाच्या मानसिकतेत हवा आहे..
बदल प्रगतीत हवा आहे.. बदल विकासात हवा आहे.. आणि बदल प्रत्येकाच्या मनात देखील हवा आहे..
बदल माणुसकीचा.. बदल आपुलकी आणि प्रेमाच्या स्वीकारण्याचा..
तो बदल घडवायला निघाला आहे.. पण तो एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे..
आणि म्हणून, त्याच्याहून जास्त जबाबदारी आपली देखील आहे.. एक नागरिक म्हणून.. की हा बदल आपण आपल्या स्वतः पासून, स्वतः च्या कुटुंबापासून करत, तो होत असलेला बदल प्रांजळ पणे स्वीकारावा आणि तो बदल टिकविण्याचा प्रामाणिक प्रयत्न देखील करावा..
त्याला प्रामाणिकपणे साथ द्यावी..!
हा उदंड सकारात्मक प्रतिसाद, काही काळाने विरून, विसरून न जाता, ती सकारात्मकता चिरंतन पोसावी..!
पुढे यातून काय फलसिद्धी होईल ते देव जाणे..
पण जो काही राजकीय उन्माद या देशात माजला आहे, त्यावर तरी निदान काही पर्याय निघेल अशी आशा आहे..!

तसे पाहिले तर, काँग्रेस पार्टीने देशाला बरेच काय दिले असले, तरीही, सत्तेच्या नादात असंख्य चुका देखील केल्या आहेत..
काँग्रेस चे लोक धर्मीय राजकारण करतात म्हणून भाजप आणि तत मित्र पक्षांना आज बोटे दाखवत असले तरीही, त्यांची पार्टी देखील मतांचे भरपूर राजकारण करत आली आहे..
सत्तेसाठी धर्म, जात त्यांनी देखील फोफावत वर आणली.. आणि आजही त्या गोष्टी ते करतात..!
एकाला उराशी धरून दुसऱ्याला उपरे करण्याचा प्रकार यांनी देखील केला.. आणि त्याच्याच विरोधात आता भाजपा करते आहे..!
पण आता याउपर विचार करून ही यात्रा चालवण्याचा मानस काही वेगळा ठरेल..!
कोणालाही धर्म, जात, संप्रदाय याबाबतीत कवटाळून पोटाशी धरणे आता कोणत्याही पार्टीला तसे परवडणारे नाहीच, हे सर्वांनीच ओळखावे..!
कदाचित राहुल गांधींनी ताडले असा समज तरी सध्या करून घेऊ..!

पण आजही राहुल गांधी काहीशा काँग्रेस पार्टीच्या भवितव्यासाठी निघाले असले तरीही, एका वेगळ्या उदात्त उद्देशाने ते वाटचाल करत असतांना, काँग्रेसचे काही नेते अजूनही त्यांची मनीषा न समजून घेता, बरेच जण स्वतःला किंवा स्वतःच्या नातेवाईकांना प्रमोट आणि लाँच करत या यात्रेत संधी म्हणून सहभागी होत असताना दिसत आहेत..!
आतातरी निदान या काँग्रेसच्या सत्तापिपासू नेत्यांनी राहुल गांधींचा निर्मळपणा समजून घेऊन त्यांना साथ द्यावी.. जनतेचा कौल समजून घ्यावा..!
सत्तेप्रती नाही, तर देशाप्रती निष्ठा दाखवावी..
त्यांना कधीही जनता अंतर देणार नाही..!
हा काही इव्हेंट नाही.. ही काही स्वार्थ साधण्याची संधी नाही.. आणि फोटोसेशन करून केवळ दिखावा करत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा अग्नी नाही..
ही एक नवप्रज्वलित मशाल आहे.. जी द्वेषाचा अंधार दूर करून एकतेचा प्रकाश पसरवण्यासाठी निघाली आहे.. हे सर्वांनी समजून घ्यावे..!

सारा देश आज जणू या यात्रेच्या निमित्ताने एक आशेच्या किरणांचा उत्सव साजरा करत आहे..
या आशेच्या उत्सवाचा सुखद परिणाम होवो..
कुठल्याही पार्टीचे समर्थन मी करत नाही.. पण वैचारिक सुबत्ता नांदायला हवी..!
जी विविधांगी नफरत, मग ती धार्मिक नफरत असो.. जातीय असो.. आर्थिक असो.. अथवा वैचारिक किंवा राजकीय व सामाजिक नफरत असो.. हे सर्व या पावलांच्या खाली धुळीसंगे मातीत मिळो..
जुन्या पिढीच्या अनुभवातून, वर्तमान पिढीने शिदोरी घेऊन, नवीन पिढीला नवीन शिदोरी देण्यासाठी या पावलासंगे या रस्त्यांनी भारत जोडू दे..

धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे..
एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे..
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे..!!
©️®️ *डॉ.अंजली मुळके*
मुंबई
फोन – 8879063132