Chinchwad News : ‘गणपती चालले गावाला…चैन पडेना आम्हाला’च्या जयघोषात अरविंद एज्युकेशनच्या गणरायाला निरोप

Chinchwad News : ‘गणपती चालले गावाला…चैन पडेना आम्हाला’च्या जयघोषात अरविंद एज्युकेशनच्या गणरायाला निरोप

Pckhabar-टाळ मृदंगाचा गजर, लेझीम, दांडिया, लाठीकाठी, तलवारबाजी अशा विविध कसरती आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या गणपतीला विद्यार्थी, शिक्षकांनी निरोप दिला.
सांगवीतील सात दिवसांच्या गणपतीला मंगळवारी निरोप दिला. अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या गणरायाला निरोप देण्यासाठी विद्यार्थ्यांनी पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान करीत सांगवीतून बाप्पाची मिरवणूक काढली. ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप दिला. आकर्षक फुलांची सजावट, विद्यार्थ्यांचा पांढरा ड्रेस कोड नागरिकांचे लक्ष आकर्षून घेत होता. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी बालचमुंच्या कसरती, लेझीम पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. शिक्षिकांनी फुगड्यांचे फेर धरले होते.
शिवयोद्धा मर्दानी आखाडा पथकाच्या लाठीकाठी, तलवारबाजीच्या कसरती अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या. ही विसर्जन मिरवणूक शितोळेनगर, गजानन महाराज मंदिर, संविधान चौकामार्गे अहिल्याबाई होळकर घाटावर आली. गणपतीची आरती करून गणरायाला जड अंतःकरणाने निरोप दिला.
गणपती विसर्जन मिरवणुकीत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव यांच्यासह मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.